भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकुर संघासाठी महत्वाचा खेळाडू बनत आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीमध्ये दोन्ही डावांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ५७ धावा केल्या आणि संघाची धावसंख्या १९१ पर्यंत पोहचवली. तसेच त्याने सामन्याच्या दुसऱ्या डावातही ६० धावांची खेळी केली आहे. तो इंग्लंडविरुद्धच्या चालू कसोटी मालिकेत एका सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
सामन्याच्या चैथ्या दिवशी भारतीय संघ ४६६ धावांवर सर्वबाद झाला असून इंग्लंडवर ३६८ धावांची आघाडी घेतली आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने बिनबाद ७७ धावा केल्या आहेत.
शार्दुलचे अष्टपैलू प्रदर्शन
सामन्याच्या पहिल्या डावात जेव्हा भारतीय संघची स्थिती ११७ धावांवर ६ विकेट अशी होती, तेव्हा शार्दुल ठाकुर मैदानात फलंदाजीसाठी आला होता. त्याने पहिल्या डावात ३६ चेंडूत ५७ धावा अशी आक्रमक खेळी केली. यामध्ये ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याची ही खेळी संघासाठी महत्वाची ठरली आणि संघाच्या धावसंखेत भर पडली. त्यानंतर शार्दुलने गोलंदाजी करताना ओली पोपची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. पोप त्यावेळी ८१ धावांवर मैदानात खेळत होता.
पुढे शार्दुल ठाकुर जेव्हा दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला होता, तेव्हाही भारतीय संघाची स्थिती अडचणीचीच होती. ३१२ धावांवर भारताचे ६ विकेट्स गेले होते आणि भारताला इंग्लंडवर केवळ २१३ धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर शार्दुलने यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतसोबत शतकी भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या ४०० पार घेऊन गेला. तसेच भारतीय संघाची इंग्लंडवरील आघाडीही त्याने ३०० धावांपेक्षा जास्त केली. त्याने सामन्याच्या दुसऱ्या डावात ७२ चेंडूत ६० धावा केल्या. यामध्ये ७ चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. तसेच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतनेही या डावात ५० धावांची महत्वाची खेळी केली.
शार्दुलच्या या अप्रतिम प्रदर्शनामुळे संघाला अष्टपैलू हार्दिक पांड्याची कमतरता भासली नाही. हार्दिक पांड्या कंबरेच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यामध्ये सहभागी झाला नव्हता. परंतु आता शार्दुलचे प्रदर्शन पाहता हार्दिकचे संघात पुनरागमन होणे अवघड झाले आहे.
केवळ ४ कसोटी सामन्यांत चमकलाय शार्दुल
शार्दुलच्या कसोटी कारकिर्दीतील हा त्याचा केवळ चौथा कसोटी सामना असून त्याला फलंदाजीसाठी मिळालेली ही सहावी संधी होती. त्याला मिळालेल्या संधींपैकी त्याने तीन वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. याव्यतिरिक्त तो एका डावात नाबाद राहिला आहे. याावर्षीच ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्या डावात अप्रतिम ६७ धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त त्याने सामन्यात ७ विकेट्सही मिळवल्या होत्या. भारतीय संघाने पहिल्या डावातील पिछाडीनंतरही हा सामना ३ विकेट्सने जिंकला होता. सामन्यातील या विजयामुळे संघाने मालिका २-१ ने जिंकली होती.
शार्दुल ठाकुरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६५ सामन्यांमध्ये २१८ विकेट्स घेतल्या आहेत आणि १३२७ धावाही केल्या आहेत. यामध्ये ७ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ओव्हल कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडला चमत्काराची गरज! भारताविरुद्धची ‘ही’ आकडेवारी देते ग्वाही
टी२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची झाली निवड, येत्या २४ तासात होणार घोषणा!
अतिविश्वास भोवणार? सातत्याने अपयशी होऊनही प्रशिक्षकांना रहाणेवर विश्वास, केले मोठे भाष्य