ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीला शनिवारी (22 ऑक्टोबर) सुरुवात झाली. दिवसातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड आणि अफगाणिस्तान (ENGvAFG) आमनेसामने आले. इंग्लंडने या सामन्यात शानदार गोलंदाजी करत अफगाणिस्तानला 112 धावांवर रोखले. त्यानंतर संघर्षपूर्ण खेळ दाखवत 5 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष पार करत विश्वचषकाचा विजयी प्रारंभ केला. अष्टपैलू सॅम करन (Sam Curran) इंग्लंडच्या विजयाचा नायक ठरला.
पर्थ येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या या खेळपट्टीवर मार्क वूड व ख्रिस वोक्स यांनी चांगली सुरुवात दिली. अफगाणिस्तानचे दोन्ही सलामीवीर अपयशी ठरले. झझाई 7 तर गुरबाज 10 धावा करत बाद झाले. इब्राहिम झादरान व उस्मान घनी यांनी अनुक्रमे 32 व 30 धावा केल्या. त्यानंतर मात्र एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकला नाही. परिणामी, अफगाणिस्तानचा डाव 112 धावांत आटोपला. अष्टपैलू सॅम करनने केवळ 10 धावा देत अफगाणिस्तानचा निम्मा संघ तंबूत धाडला. मार्क वूड व बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी दोन तर ख्रिस वोक्सने एक गडी बाद केला.
धावफलकावर थोड्या धावा लावल्या असल्या तरी, अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी अतिशय त्वेषाने गोलंदाजी केली. जोस बटलर, ऍलेक्स हेल्स व डेव्हिड मलान या तीनही फलंदाजांना अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी मोकळ्या हाताने फलंदाजी करू दिली नाही. बेन स्टोक्स व हॅरी ब्रुक हे देखील अपयशी ठरल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली. मात्र, लियाम लिव्हिंगस्टोनने वेळीच मोठे फटके खेळत संघाला पराभवापासून वाचवले. त्याने नाबाद 29 धावा केल्या. सॅम करन याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महामुकाबल्यातून पाकिस्तानचा हुकमी एक्का बाहेर! टीम इंडियाला दिलेली मोठी जखम
देशांतर्गत क्रिकेट गाजवतोय इशान किशन, ओडिसाविरुद्ध केलेले शतक ठरले ऐतिहासिक