तब्बल सतरा वर्षानंतर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळत असलेल्या इंग्लंड संघाने पहिल्या कसोटीवर कब्जा केला. रावळपिंडी येथे झालेल्या या कसोटीत अखेरच्या दिवशी इंग्लंडने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत यजमान पाकिस्तानला 74 धावांनी नमवले. यासह त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अखेरच्या दिवशी ओली रॉबीन्सन व जेम्स अँडरसन हे दोन्ही वेगवान गोलंदाज इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
Only the third Test victory for England in Pakistan 👏#WTC23 | #PAKvENG | https://t.co/PRCGXi3dZS pic.twitter.com/0K9EB0oSE4
— ICC (@ICC) December 5, 2022
रावळपिंडी येथील फलंदाजांना पूरक असलेल्या खेळपट्टीवर सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने पाकिस्तानचा पहिला डाव 579 धावांत गुंडाळला होता. तत्पूर्वी, इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात चार फलंदाजांच्या शतकांच्या जोरावर 657 धावा उभारलेल्या. त्यानंतर, इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावातही आक्रमक फलंदाजी केली. क्राऊली आणि हॅरी ब्रूक यांनी पहिल्या डावाप्रमाणे तुफानी फटकेबाजी करत धावा वसूल केल्या. त्याचवेळी पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या जो रूटनेही आक्रमक अर्धशतक झळकावले. हॅरी ब्रुक 87 धावा करून माघारी परतल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने एक धाडसी निर्णय घेतला. त्याने आपल्या संघाचा डाव घोषित करत पाकिस्तानसमोर 343 धावांचे आव्हान ठेवले.
पाकिस्तानसमोर एक प्रकारे 120 षटकात हे आव्हान पार करण्याचे लक्ष चौथ्या दिवसाखेर त्यांनी 2 बाद 80 अशी मजल मारली होती. त्यामुळे पाचव्या दिवशी पाकिस्तान विजयी लक्ष पार करणार का याकडे सर्वांचे डोळे लागलेले. मात्र, अनुभवी जेम्स अँडरसन व युवा ओली रॉबीन्सन यांच्यापुढे पाकिस्तानी फलंदाजीची वाताहात झाली. दोघांनी प्रत्येकी चार बळी आपल्या नावे केले. दुसऱ्या डावात पाकिस्तानकडून केवळ सौद शकील हाच अर्धशतक झळकावू शकला. त्यामुळे पाकिस्तानचा डाव 268 धावांवर संपुष्टात आला. विशेष म्हणजे पाकिस्तानने आपले अखेरचे पाच बळी केवळ नऊ धावांमध्ये गमावले. ओली रॉबीन्सन याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले.
बेन स्टोक्स कर्णधार झाल्यापासून प्रथमच इंग्लंड संघ आपल्या मायदेशाबाहेर खेळत होता. प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलम याच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने कसोटी क्रिकेटचा ‘बॅझबॉल’ हा आक्रमक अंदाज सर्वांना दाखवला आहे.
(England Beat Pakistan In Rawalpindi Test By 74 Runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ स्वतः संघातून बाहेर पडला? बांगलादेशमधून आली धक्कादायक माहिती समोर
राष्ट्रीय संघाकडून सुट्टी मिळाली असताना सूर्यकुमार डॉमेस्टिकमध्ये करणार धमाका, एमसीए अधिकाऱ्याची माहिती