इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यानं क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अँडरसन आपला शेवटचा कसोटी सामना या वर्षी जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळेल. क्रिकेटचा ‘मक्का’ म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियमवर 10 ते 14 जुलै दरम्यान हा कसोटी सामना खेळला जाणार आहे.
41 वर्षीय जेम्स अँडरसननं 2003 मध्ये लॉर्ड्सवरच कसोटी पदार्पण केलं होतं. त्यानं इंग्लंडसाठी 187 कसोटी सामन्यांत 700 बळी घेतले आहेत. अँडरसन हा 700 कसोटी बळींचा महाकाय टप्पा गाठणारा पहिला वेगवान गोलंदाज आहे. यावर्षी भारताविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत कुलदीप यादवला बाद करून त्यानं कसोटीमध्ये 700 बळी पूर्ण केले होते.
निवृत्तीबाबत बोलताना अँडरसन म्हणाला, “लॉर्ड्सवर या उन्हाळ्यात होणारी पहिली कसोटी ही माझी शेवटची कसोटी असेल. लहानपणापासून मला आवडलेल्या खेळात माझ्या देशाचं 20 वर्ष प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी अविश्वसनीय होतं. आता या खेळापासून दूर जाण्याची आणि इतरांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे.”
जेम्स अँडरसनची क्रिकेट कारकीर्द
जेम्स अँडरसननं 2003 मध्ये लॉर्ड्सवर झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तो 187* सामने खेळला आहे. फक्त ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरनं अँडरसनपेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. सचिनच्या नावावर 200 कसोटी सामने आहेत. जेम्स अँडरसननं 194 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 269 विकेट्स आहेत. याशिवाय त्याच्या नावावर 19 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18 विकेट आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका 1992-2010) : 133 कसोटी 800 बळी
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया 1992-2007) : 145 कसोटी – 708 बळी
जेम्स अँडरसन (इंग्लंड 2003-2024) : 187* कसोटी – 700* बळी
अनिल कुंबळे (भारत 1990-2008) : 132 कसोटी – 619 बळी
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड 2007-2023) : 167 कसोटी – 604 बळी
ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया 1993-2007) : 124 कसोटी – 563 बळी
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग बातमी! दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतचं निलंबन! बीसीसीआयची मोठी कारवाई