प्रतिष्ठेच्या ऍशेस कसोटी मालिकेतील पहिला सामना बर्मिंघम येथे खेळला गेला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी (मंगळवार 20 जून) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 2 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत संघाला विजयी रेषेपार नेले. त्याचवेळी इंग्लंडला देखील या सामन्यात विजयाची संधी होती. मात्र, ते ऑस्ट्रेलियाचे अखेरचे दोन फलंदाज बाद करू शकले नाहीत. अशावेळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने आपल्या निर्णयाची व संघाची पाठराखण केली आहे.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 281 धावांचे आव्हान दिल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था 8 बाद 227 अशी केली होती. मात्र, त्यानंतर कमिन्स व लायन यांनी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. सामन्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना इंग्लंडचा कर्णधार स्टोक्स म्हणाला,
“आमचे गोलंदाज सामना अखेरपर्यंत घेऊन गेले याचा अभिमान वाटतो. अशा सामन्यांमुळेच कसोटी क्रिकेटची लोकप्रियता टिकून आहे. पहिला डाव घोषित करण्याच्या निर्णयाबाबत विचाराल तर, मला त्याचा पश्चाताप होत नाही. ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवण्याची ती एक संधी होती. अखेरच्या वीस मिनिटात बळी मिळवणे काही वेळा सोपे असते. मात्र, ती गोष्ट घडली नाही. ऑस्ट्रेलियाने आमच्यापेक्षा सरस खेळ दाखवला.”
या सामन्याचा विचार केल्यास इंग्लंडने जो रूटच्या शतकाच्या जोरावर पहिल्या दिवशी 393 धावांवर आपला डाव घोषित केलेला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तर देत ख्वाजाच्या शतकासह 386 पर्यंत मजल मारली. इंग्लंडला आपल्या दुसऱ्या डावात 273 धावा करता आल्या. विजयासाठी मिळालेले 281 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 गडी राखून पूर्ण केले. पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात अर्धशतक करणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा सामनावीर ठरला.
(England Captain Ben Stokes Said No Regret For Declare Inning)
महत्वाच्या बातम्या –
MPL 2023मध्ये रत्नागिरी जेट्सचा दुसरा विजयी, सीएसके ‘इतक्या’ धावांनी पराभूत
ऑस्ट्रेलियाने फोडला इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’चा फुगा! ऍजबस्टन कसोटीत मिळवला थरारक विजय