ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. आगामी 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष बघायला मिळणार, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. यादरम्यानच इंग्लंडचा कर्णधार जो रुटची प्रतिक्रिया समोर येत असून त्याने मालिकेत इंग्लंड पेक्षा भारतावर दबाव असल्याचे म्हटले आहे.
सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत रूट म्हणाला, “या अविश्वसनीय मालिकेचा भाग होणे खरोखरच सुखद आहे. भारतीय संघाने नुकतेच ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत केले. आता आम्हाला भारताला भारतात हरवण्याची संधी आहे. इंग्लंडपेक्षा भारतीय संघावर जास्त दबाव असेल, कारण ते त्यांच्या भूमीवर खेळत आहेत. भारताला त्यांचा अजय रेकॉर्ड देखील अबाधित ठेवायचा आहे. आमचा संघ उत्तम असून आम्ही नुकतीच चांगली कामगिरी केलेली आहे.”
भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना हा जो रुटसाठी खास ठरणार आहे. कारण हा त्याचा कसोटी कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असणार आहे. 100 कसोटी सामने खेळणारा तो इंग्लंडचा 15 वा खेळाडू ठरेल.
इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर 4 कसोटी, 5 टी 20 व 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारी पासून चेन्नई येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने ही मालिका उत्कंठावर्धक होण्याची सर्व क्रिकेटप्रेमींना अशा असणार आहे.
भारतासाठी या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहलीसह अनेक महत्त्वाचे खेळाडू पुनरागमन करणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मालिकेत भारतीय संघ उत्तम कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“ऑस्ट्रेलियामधील विजय हा विशेष होता, पण आता ती घटना घडून गेली आहे”
INDvENG : पहिल्या सामन्यासाठी ठरले भारतीय सलामीवीर, तर यष्टिरक्षक म्हणून मिळाली ‘या’ खेळाडूला संधी
टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमपर्यंत पोहचले शेतकरी आंदोलन, विराट कोहलीने दिली माहिती