मंगळवारी (5 जून) टी20 विश्वचषक 2024 च्या ग्रुप स्टेजचा सहावा सामना इंग्लंड आणि स्कॉटलँड यांच्यात बार्बाडोसच्या केनसिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला गेला. मात्र पावसानं व्यत्ययं आणल्यामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. यानंतर दोन्ही संघांना 1-1 गुण वाटून देण्यात आला. अशाप्रकारे इंग्लंडचा संघ त्यांच्या नावे असलेला एक लाजिरवाणा विक्रम मोडू शकला नाही.
या सामन्यात स्कॉटलँडच्या संघानं 10 षटकं फलंदाजी केली. ती पण सलग झाली नाही, कारण पावसानं सतत व्यत्यय आणला होता. शेवटी सामना रद्द करण्यात आला. यासह इंग्लंडचं युरोपियन देशाविरुद्ध टी20 सामना जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलेलं नाही.
तुम्हाला जाणून धक्का बसेल की, युरोपमधील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघ असलेला इंग्लंड अद्याप युरोपच्या अन्य देशांविरुद्ध एकही टी20 सामना जिंकू शकलेला नाही! जरी इंग्लंडनं युरोपियन संघांविरुद्ध फार कमी सामने खेळले असले, तरी संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. इंग्लंडनं आतापर्यंत 3 युरोपियन देशांविरुद्ध 5 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, मात्र त्यांना एकाही सामन्यात विजय मिळालेला नाही. यापैकी 2 सामने पावसानं वाहून गेले, तर 3 सामन्यांत त्यांचा पराभव झाला.
इंग्लंडनं नेदरलँडविरुद्ध 2 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांत त्यांना पराभव पत्कारावा लागला. इंग्लंडच्या संघानं आयर्लंडविरुद्धही इतकेच टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यापैकी एका सामन्यात त्यांचा पराभव झाला, तर एक सामना पावसामुळे वाहून गेला. आता स्कॉटलँडविरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द झाला. अशाप्रकारे, इंग्लडचा संघ युरोपियन देशांविरुद्ध अद्याप एकही टी20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकू शकलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
पावसामुळे वाहून जाईल भारत विरुद्ध आयर्लंड सामना? आज न्यूयॉर्कमधील हवामान कसं असेल? सर्वकाही जाणून घ्या
टी20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा शानदार विजय, इंग्लंडचं मोठं नुकसान
टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील असे 5 सामने ज्यात सर्वाधिक डॉट बॉल खेळले गेले