कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट घेणे म्हणजे एक मोठी कामगिरी असते. जर आपण ५०० कसोटी विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाहिलं तर आपल्याला केवळ ६ गोलंदाजांची नावे दिसतील. ज्यांनी ५०० आणि त्याहून अधिक विकेट्स मिळविले आहेत.
त्यामध्ये मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) ८००, शेन वॉर्न (Shane Warne) ७०८, अनिल कुंबळे (Anil Kumble) ६१९, जेम्स अँडरसन (James Anderson) ५८४, ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) ५६३ आणि कोर्टनी वॉल्श (Courtney Walsh) ५१९ यांनी विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीमध्ये ५०० विकेट्स घेण्याचा मान सर्वप्रथम वेस्ट इंडीजच्या कोर्टनी वॉल्शने मिळवला होता.
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) देखील लवकरच ५०० विकेट्स मिळवणाऱ्यांच्या ताफ्यात सामील होऊ शकतो. याबद्दल आयसीसीनेही ट्विट केले आहे. ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ४८५ विकेट्स घेतल्या आहेत.
५०० कसोटी विकेट्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त १५ विकेट्सची आवश्यकता आहे. जर त्याने या १५ विकेट्स बुधवारपासून(८ जूलै) सुरु झालेल्या इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत घेतल्या तर असा विक्रम करणारा तो इंग्लंडचा दुसरा गोलंदाज आणि जगातील सातवा गोलंदाज असेल.
पण सध्यातरी या मालिकेतील साऊथँम्पटन येथे सुरु झालेल्या पहिल्या कसोटीत त्याला अंतिम ११ जणांच्या इंग्लंड संघात संधी मिळालेली नाही. पण जर त्याला या मालिकेतील उर्वरित सामन्यात संधी मिळाली तर त्याला ५०० कसोटी विकेट्स घेण्याचा टप्पा पार करण्याची संधी असेल.
स्टुअर्ट ब्रॉडने डिसेंबर २००७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केलं होतं. इंग्लंडकडून आतापर्यंतच्या १३८ कसोटी सामन्यांमध्ये तो सहभागी झाला. त्याने १७ वेळा एका डावात ५ विकेट्स घेतले आहेत. याशिवाय त्याने दोन वेळा कसोटी सामन्यात १० विकेट्स घेतले आहेत. त्याचे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन १५ धावांत ८ विकेट्स असे आहे.