भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना १० सप्टेंबरपासून ओल्ट ट्रेफर्ड मैदानावर खेळला जाणार होता. मात्र, भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करून बीसीसीआयने आणि ईसीबीने हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर बीसीसीआयने हा सामना भविष्यात पुन्हा आयोजित करण्याचा प्रस्तावही मांडला आहे.
या सामन्यानंतर इंग्लंडचा ३९ वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याच्या निवृत्तीच्या अफवा पसरल्या आहेत. अशात त्याने स्वत: या याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
कसोटी मालिकेतील शेवटचा सामना चाहत्यांना पाहायला मिळाला नाही. पण मालिकेतील पहिले चार सामने खूप रोमांचक ठरले होते. मालिकेत भारतीय खेळाडूंबरोबर इंग्लंडच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचे प्रदर्शन पाहण्यासारखे होते. त्याने मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहलीला हैराण केले होते आणि बऱ्याचदा त्याची विकेटही घेतली होती. तो भारताविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर क्रिकेटमधून संन्यास घेणार असा अंदाज बांधला जात आहे.
ऍशेस मालिकेत खेळणार अँडरसन
अँडरसनने त्याच्या निवृत्तीविषयी स्पष्टीकरण देत होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. त्याने ‘द टेलीग्राफ’मधील त्याच्या काॅलममध्ये लिहीले आही की, “मला आशा आहे की, मी इंग्लंडसाठी आणखी एकदा खेळेल. याचाच अर्थ असा होतो की, मी डिसेंबरमध्ये ऍशेस मालिकेत खेळणार आहे. मी माझ्या योजनांमध्ये वेस्टइंडीज दौराही सामील केलेला आहे.”
इंग्लंड संघ येत्या काळात न्यूझीलँडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मलिका खेळणार आहे. यासंदर्भात अँडरसन म्हणाला, “न्यूझीलँडविरुद्धच्या तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत आराम आणि रिकव्हरीसाठी खूप वेळ आहे. मला या गोष्टींचे व्यवस्थापन करणे सोपे वाटत आहे.” थोडक्यात सांगायचे झाल्यास, अँडरसन या मालिकेतही खेळण्यास तयार असल्याचे संकेत त्याने दिले आहेत.
भारताविरुद्धच्या कोसोटी मालिकेत अँडरसनने १५ विकेट्स घेतल्या असून तो मालिकेत ओली राॅबिन्सननंतर दुसरा सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणारा खेळाडू ठरला आहे. ओली राॅबिन्सनने मालिकेत सर्वाधिक २१ विकेट्स मिळवल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अंतिम कसोटी रद्द होण्यासाठी आयपीएलला जबाबदार धरणाऱ्यांना इरफानचे खडेबोल; म्हणाला, ‘माझे दात पडले…’
भारतीय खेळाडूंचा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा, दुसऱ्यांदा कोरोना चाचणीचा निकाल निगेटिव्ह, पण…