सध्याच्या काळात सातत्याने क्रिकेटचा मारा होत आहे, किती व्यस्त वेळापत्रक आहे, असे सातत्याने ऐकू येते. पण जर अनेकांना असे सांगितले की १९३०मध्ये इंग्लंड संघ एकाचवेळी जगातील २ वेगवेगळ्या ठिकाणी २ कसोटी सामने खेळत होता, तर अनेकांना आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे, १३ जानेवारी १९३० मध्ये एकाच दिवशी इंग्लंडचा एक संघ न्यूझीलंडविरुद्ध ख्राईस्टचर्च येथे तर ब्रिजटाऊन येथे इंग्लंडचा दुसरा संघ वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी सामना खेळत होता. क्रिकेट इतिहासातील ही एकमेव अशी घटना आहे की एकाच देशाचे दोन संघ एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी २ कसोटी सामने खेळत होते. पण त्यामागे काय कारण आहे हे या लेखातून जाणून घेऊया.
इसपीएनने दिलेल्या एका रिपोर्टनुसार १९२० च्या दरम्यान इंपेरिएल क्रिकेट कॉन्फरन्स म्हणजेच आत्ताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) कसोटी क्रिकेटचा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या बाहेरही प्रसार करण्याच्या विचारात होते. त्यानुसार १९२६ ला झालेल्या एका बैठकित वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडलाही कसोटीचा दर्जा देण्याचा निर्णय झाला.
त्यानंतर वेस्ट इंडिजने इंग्लंडमध्ये १९२८ ला पहिला कसोटी सामना खेळला. त्यावेळी ते पहिल्या तीन दिवसीय सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सर्व सामने पराभूत झाले. पण त्यात त्यांनी चांगला संघर्ष केला होता.
त्यावेळी एमसीसी जे इंग्लंड क्रिकेट चालवत होते, त्यांनी विचार केला की त्यांचे संघ जर परदेशात गेले तर तिथे क्रिकेटचा प्रचाराला मदत होईल. त्यानुसार इंग्लंडच्या संघाने कॅरेबियन बेटांवर दौरे केले पण कोणतीही अधिकृत कसोटी खेळले नव्हते. त्याप्रमाणे इंग्लंड जेव्हा ऑस्ट्रेलियाला ऍशेस खेळायला जायचा त्यावेळी ते येता-येता न्यूझीलंडचा दौराही करुन यायचे.
पण एमसीसीला आता दोन्ही देशांत कसोटी मालिका खेळण्यासाठी संघ पाठवायचा होता. परंतू त्यांचे ऑस्ट्रेलियाचे आणि दक्षिण आफ्रिकेचे दौरे आधीच ठरले होते. त्यात हे दौरे मोठे होते. पण १९२९-३० मध्ये वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा दौरा केला जाईल असा निर्णय झाला. त्यावेळी न्यूझीलंडचा स्वतंत्र दौरा असेल असेही नक्की झाले. पण ऍशेसनंतर त्या दौऱ्यावर जाण्यासाठी सर्व खेळाडू तयार नव्हते.
इंग्लंडचा कर्णधार आर्थर गिलीगनने तब्येतीचे कारण देत या दौऱ्यातून माघार घेतली. त्यामुळे त्याचा मोठा भाऊ हॅरॉल्ड गिलीगनला न्यूझीलंड दौऱ्यासाठी कर्णधारपद देण्यात आले. त्यावेळी ३४ वर्षीय होराल्ड एकही सामना इंग्लंडकडून खेळला नव्हता. त्याने केवळ १९२९ ला ससेक्सचे नेतृत्व केले होते. त्याच्यासह १४ सदस्ययी संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार होता. यात ४२ वर्षीय फ्रँक वूली यांचा देखील समावेश होता. तसेच त्याव्यतिरिक्त दुलिपसिंग, टेड बावली, फ्रेड बॅरेट आणि जॉफ्री लेग हे चार खेळाडू त्याआधी इंग्लंडकडून खेळले होते. बाकी संघातील खेळाडूंना इंग्लंडकडून खेळण्याचा अनुभव नव्हता.
या दौऱ्याच्या तुलनेत वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणारा इंग्लंड संघ जास्त चांगला आणि प्रतिभाशाली होता. कारण वेस्ट इंडिज दौरा न्यूझीलंडपेक्षा कठिण होता. त्या दौऱ्यात काही दिग्गजांना पाठवण्याचा निर्णय झाला.
त्यावेळी जॅक हॉब्सला पाठवावे म्हणून मागणी वाढत होती. पण त्यावेळी ४७ वर्षांचे असलेल्या हॉब्सला इंग्लंडच्या निवडकर्त्यांनी १९३० च्या ऍशेस मालिकेसाठी विश्रांती देण्याचे ठरवले होते. पण त्यांनी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जॉर्ज गन (५१ वर्षे), नायजेल हेग (४२), जॅक ऑकनोर,एवार्ट ऍस्टिल (४१), अँड्र्यू सँधम (३९), रोनाल्ड स्टॅनीफोर्थ (३८), अशा खेळाडूंना संघात स्थान दिले. ज्यांनी काही वर्षांपूर्वी शेवटचे सामने खेळले होते. तसेच पॅस्टि हेंड्रेन (४०) हे देखील संघात होते. पण ते संघाचे तेव्हाही नियमित सदस्य होते.
यातील सर्वात वयस्कर होते ते विलफ्रेड ऱ्होड्स (५२). ते १९२१ नंतर इंग्लंडकडून खेळले नव्हते. याव्यतिरिक्त बिल वोस (२०), लेस अम्स (२४), लेस्ली टाऊनसेंड (२६), बॉब व्हॅट (२८) आणि ग्रेविल स्टिव्हन्स(२९) असे युवा खेळाडू देखील इंग्लंड संघात होते. तसेच फ्रेडी कॅल्थोर्प (३८) हे इंग्लंड संघाचे कर्णधार होते.
त्यावेळी दोन्ही दौरे ४ कसोटी सामन्यांचे होते. यामध्ये वेस्ट इंडिज दौरा इंग्लंड संघासाठी थोडा जड गेला. त्यांनी त्या दौऱ्यातील १३ प्रथम श्रेणी सामन्यांपैकी ४ सामने जिंकले तर २ सामने ते पराभूत झाले. तसेच कसोटी मालिकेतील १ सामना इंग्लंडने तर १ सामना वेस्ट इंडिजने जिंकला. तसेच २ सामने अनिर्णित राहिले.
पण न्यूझीलंडमध्ये इंग्लंड संघ चांगला खेळला. न्यूझीलंडमधील ३ दिवसीय सामने होते. याच दौऱ्यात न्यूझीलंडने कसोटीमध्ये पदार्पण केले होते. न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडला कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकता आला होता. मात्र नंतरचे ३ सामने अनिर्णित राहिले होते. या न्यूझीलंड दौऱ्यात एकूण १७ सामने झाले होते. त्यातील ९ सामने जिंकण्यात इंग्लंडला यश आले होते. तर ८ सामने अनिर्णित राहिले होते. त्या संपूर्ण दौऱ्यात इंग्लंडच्या फ्रँक वूली यांनी ५१ च्या सरासरीने धावा करताना ६८ विकेट्ही घेतल्या होत्या. तर त्यावेळी इंग्लंडकडून खेळणारे दुलिपसिंग यांनी १४२१ धावा केल्या होत्या.
या दोन्ही दौऱ्यादरम्यानच्या पहिल्या सामन्याचा कालावधी सारखाच होता. म्हणजे न्यूझीलंड दौऱ्यातील पहिला कसोटी सामना १० ते १३ जानेवारीला तर वेस्ट इंडिज दौऱ्यातील पहिला कसोटी सामना ११ ते १६ जानेवारीला खेळवण्यात आला होता. यावेळी १३ जानेवारी ही अशी तारिख होती ज्यावेळी दोन इंग्लंडचे संघ एकाचवेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पहिल्यांदाच २ वेगवेगळे कसोटी सामने खेळत होते. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यातील चौथा कसोटी सामना २१ ते २४ फेब्रुवारीदरम्यान ऑकलंड येथे खेळला जात होता. तर वेस्ट इंडिज दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना २१ ते २६ फेब्रुवारीदरम्यान जॉर्जटाऊन येथे खेळला जात होता. त्यावेळीही एकाचवेळी दोन सामने इंग्लंडचा संघ खेळत होता. पण या दौऱ्यांनतंर असे कधीच झाले नाही की एक संघ एकाचवेळी दोन वेगवेगळे कसोटी सामने खेळत होता.
वाचनीय लेख –
३ असे सामने, जे टीम इंडिया जिंकता-जिंकता झाली पराभूत
आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये २ लाखांपेक्षा जास्त धावा करणारे तीन संघ
९९.९४ची जबरदस्त सरासरी असलेल्या डॉन ब्रॅडमनना कायम ‘गिऱ्हाईक’ करणारा गोलंदाज