भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आज निकाली ठरला. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळवल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. चौथ्या डावात इंग्लंडने विजयासाठी दिलेले ४९ धावांचे सोपे लक्ष्य भारताने अगदी सहज गाठले.
एकूणच हा सामना अतिशय कमी धावसंख्येचा ठरला. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ ११२ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर ३ बाद ९९ अशी चांगली सुरुवात करूनही भारतीय संघाचा डाव १४५ धावांवर आटोपला. मात्र दुसऱ्या डावात इंग्लंडने याहूनही वाईट कामगिरी केली. त्यांचा डाव अवघ्या ८१ धावांत संपुष्टात आला.
भारताविरुद्धची दुसरी नीचांकी धावसंख्या
इंग्लंडने या कसोटी सामन्यात नोंदवलेली ८१ ही धावसंख्या कोणत्याही संघाने भारताविरुद्ध कसोटी सामन्यात नोंदवलेली दुसऱ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या ठरली. भारताविरुद्ध कसोटी सामन्यात सर्वाधिक नीचांकी धावसंख्येचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. २०१५ सालच्या भारत दौऱ्यात नागपूर कसोटीत दक्षिण आफ्रिकन संघ ७९ धावांवर सर्वबाद झाला होता. हीच भारताविरुद्धची कोणत्याही संघाची सर्वात नीचांकी धावसंख्या आहे.
इंग्लंडची आजची ८१ ही धावसंख्या आता दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. त्यांनी यापूर्वी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेला मागे टाकले. यापूर्वी श्रीलंकन संघ चंदिगढ येथे १९९० साली खेळवल्या गेलेल्या सामन्यात ८२ धावांवर गुंडाळला गेला होता. ही भारताविरुद्ध कसोटी सामन्यातील आता तिसऱ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या आहे.
Lowest total v India in Tests:
79 : South Africa, Nagpur, 2015
81 : England, Ahmedabad, 2021*
82 : Sri Lanka, Chandigarh, 1990#INDvENG— Umang Pabari (@UPStatsman) February 25, 2021
दरम्यान, या सामन्यातील विजयाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्याचा मार्ग भारतासाठी सुकर झाला आहे. आता चौथी कसोटी अनिर्णीत राहिल्यास अथवा भारताने त्यात विजय मिळवल्यास ते १८ जूनपासून सुरु होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडच्या संघाशी दोन हात करतील. मात्र त्याच वेळी इंग्लंडच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा मात्र या पराभवाने धुळीस मिळाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
फक्त ८४२ चेंडूत संपला सामना अन् अहमदाबाद कसोटीची झाली इतिहासात नोंद
भारताच्या विजयानं इंग्लंडचे कसोटी चॅम्पियनशीपचं स्वप्न भंगलं; आता भारत, ऑस्ट्रेलियामध्ये चूरस
भारताच्या विजयानं इंग्लंडचे कसोटी चॅम्पियनशीपचं स्वप्न भंगलं; आता भारत, ऑस्ट्रेलियामध्ये चूरस