इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी ऍशेस मालिका अवघ्या काही दिवसांवर आली आहे. इग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स ऍशेस मालिकेतून क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. तर, पॅट कमिन्सच्या रुपात ऑस्ट्रेलिया संघाला नवीन कर्णधार मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज कर्णधार इयान चॅपल आगामी ऍशेस मालिकेविषयी व्यक्त झाले आहेत. त्यांच्या मते स्टोक्स आणि कमिन्स या दोघांना स्वतःला या मालिकेत सिद्ध करावे लागणार आहे.
एशेस मालिकेतील पहिला सामन्याला ८ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाईल. बेन स्टोक्स मानसिक आरोग्यावर लक्ष देण्यासाठी मागच्या काही महिन्यांपासून विश्रांतीवर होता. आता तो या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. तसेच टिम पेनने ऑस्ट्रेलिया कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर पॅट कमिन्सला ही जबाबदारी सोपवण्यात आली. अशात या दोन्ही खेळाडूंवर सर्वांचेच लक्ष असणार आहे.
ऍशेस मालिकेचे विश्लेषण करताना चॅपल यांनी त्यांच्या स्तंभामध्ये लिहिले की, “असे वाटत आहे की, इंग्लंडला लवकरच गाबामध्ये स्वतःला सिद्ध करावे लागेल. नाहीतर, ऑस्ट्रेलिया संघ पूर्णपणे त्यांच्यावर वर्चस्व गाजवेल. इंग्लंडकडे पहिल्या कसोटी सामन्यात संधी आहे. खेळपट्टीविषयी जास्त काही माहिती नाहीये. बेन स्टोक्स पूर्ण अष्टपैलूच्या रूपात पुनरागमन करणार आहे. पॅट कमिन्सला कर्णधाराच्या रूपात स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.”
चॅपल यांनी कमिन्सच्या नेतृत्वाविषयी विश्वास व्यक्त केला. “तो आतापर्यंतच्या ऑस्ट्रेलियाच्या सर्वात प्रेरणादायी क्रिकेटपटूंपैकी एक आहे. जर कमिन्सच्या नेतृत्वात कोणत्या खेळाडूला प्रेरणा नाही मिळाली, तर तो वेगळ्या वातावरणात खेळत आहे,” असे त्यांनी लिहिले.
त्यांच्या मते स्टोक्सने जर स्वतःला लवकर सिद्ध केले, तर इंग्लंड संघाला अधिक फायदा मिळेल. त्यांनी लिहिले की, “जर स्टोक्सने स्वतःला ऑस्ट्रेलियन्सच्या डोक्यात बसवले, तर तो खूप यशस्वी होऊ शकतो. जरी इंग्लंडने पहिला कसोटी सामना जिंकला नाही तरी, त्या सामन्यात वर्चस्व राखावे लागेल. जर ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनमध्ये त्यांचा दम दाखवला, तर ते पूर्ण मालिकेत इंग्लंडवर वर्चस्व गाजवतील.”
दरम्यान, बेन स्टोक्सने यापूर्वी २०१९ सालच्या ऍशेस मालिकेत सहभाग घेतला होता. तो यावर्षी ऍशेसमध्ये दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने ५५.१२ च्या सरासरीने ४४१ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने हेडिंग्लेमध्ये १३५ धावांची नाबाद खेळी केली होती. त्याचसोबत स्टोक्सने ८ विकेट्स देखील घेतल्या होत्या.