लॉर्ड्स येथील दुसऱ्या कसोटीतील दारूण पराभवानंतर इंग्लंड संघात मोठी खळबळ उडाली आहे. लॉर्ड्सवरील पराभवानंतर यजमानांनी आपले 3 खेळाडू संघातून वगळले आहेत. याचबरोबर इंग्लंडने संघात एक नवीन फलंदाज आणि एक वेगवान गोलंदाजाला स्थान दिले आहे. 25 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या लीड्स कसोटीसाठी डेव्हिड मलान आणि साकिब महमूद यांना इंग्लिश संघात स्थान मिळाले आहे. तसेच, भारतीय संघाला रोखण्यासाठी इंग्लंडने नवीन रणनीती बनवायला सुरुवात सुद्धा केली आहे. इंग्रजी माध्यमांच्या वृत्तानुसार इंग्लंड आपला फलंदाजी क्रम बदलणार आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडची सलामी जोडी ही सर्वात मोठी कमकुवत बाजू राहिली आहे. दोनही कसोटी सामन्यात डॉम सिबली आणि रोरी बर्न्स संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाहीत. लॉर्ड्समध्ये झालेल्या पराभवानंतर डॉम सिबलीला वगळण्यात आले आहे आणि आता लीड्समध्ये इंग्लंड नवीन सलामी जोडीसह उतरण्याची दाट शक्यता आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, लॉर्ड्स कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळलेला हसीब हमीद आता रोरी बर्न्ससोबत सलामीला दिसणार आहे. त्याचबरोबर जगातील प्रथम क्रमांकाचा टी20 फलंदाज डेव्हिड मलानला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळणार आहे. डेव्हिड मलान टी-20 क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येत असतो. पण हा मलान कसोटीत या क्रमांकावर कधीही खेळलेला नाही. मलानने क्रमांक चारवर तीन कसोटी खेळल्या आहेत आणि 12 कसोटी सामने त्याने पाचव्या स्थानावर खेळले आहेत.
मलानची कसोटी कारकीर्द पाहिली तर काही विशेष राहिलेली नाही. या फलंदाजाने 15 कसोटीत फक्त 27.84 च्या सरासरीने 724 धावा केल्या आहेत. मलानच्या बॅटमधून एक शतक आणि 6 अर्धशतके आली आहेत. 2018 मध्ये त्याने भारताविरुद्ध कसोटी मालिकेत शेवटचा सामना खेळला होता आणि तो दोन्ही डावांमध्ये फक्त 28 धावा करू शकला होता.
आता इंग्लंडचा संघ अडचणीत आहे आणि इंग्लंडला त्याच्याकडून चांगल्या डावाची अपेक्षा असेल. मात्र, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचा फॉर्म पाहता इंग्लंडची वरची फळी जास्त काळ खेळपट्टीवर राहू शकेल असे वाटत नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
अँडरसनच्या नाराजीचे कारण आले समोर; ‘या’ क्षुल्लक गोष्टीमुळे बुमराहवर झाला होता नाराज
‘राहुल द्रविडचे भारताचा प्रशिक्षक न बनणे भारतासाठी लाभदायी’; माजी क्रिकेटरचे मत