लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने तिसऱ्या दिवसाखेर 6 बाद 357 धावा केल्या आहेत.
त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात 250 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून या डावात अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने शतक तर जॉनी बेअरस्टोने अर्धशतक केले आहे.
भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवसाखेर 107 धावांवर संपूष्टात आल्याने तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव सुरु झाला. इंग्लंडच्या या डावाची सुरुवात खराब झाली होती.
पहिल्या 10 षटकांमध्येच इंग्लंडचे अॅलिस्टर कूक(21) आणि केटन जेनिंग्ज(11) बाद झाले होते. कूकला इशांत शर्माने तर जेनिंग्जला मोहम्मद शमीने बाद केले.
त्याच्या पाठोपाठ काही वेळानंतर या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला 20 वर्षीय ओली पोप बाद झाला. त्याला 18 धावांवर हार्दिक पंड्याने बाद केले.
त्यानंतर लगेचच इंग्लंडचा कर्णधार जो रुटला बाद करण्यात शमीला यश आले. रुट 19 धावा करत स्वस्तात माघारी परतल्याने इंग्लंडची आवस्था पहिल्या सत्रात 4 बाद 89 धावा अशी झाली होती.
मात्र यानंतर इंग्लंडचा डाव जॉस बटलर आणि जॉनी बेअरस्टोने सावरायला सुरुवात केली. पण आक्रमक खेळणाऱ्या बटलरला शमीने पायचीत बाद करत इंग्लंडला पाचवा धक्का दिला.
बटलर बाद झाल्यावर बेअरस्टो आणि अष्टपैलू ख्रिस वोक्सची जोडी जमली. त्यांनी इंग्लंडच्या पहिल्या डावाची जबाबदारी घेत सहाव्या विकेटसाठी 189 धावांची भक्कम भागिदारी रचली.
वोक्सने त्याचे कसोटीतील पहिले शतक झळकावले. त्याने तिसऱ्या दिवसाखेर 159 चेंडूत नाबाद 120 धावा केल्या आहेत. यात त्याने 18 चौकार मारले आहेत.
पण बेअरस्टोचे शतक थोडक्यात 7 धावांनी हुकले. तो 93 धावांवर असताना पंड्याने त्याला बाद केले. बेअरस्टोने त्याच्या या खेळीत या 144 चेंडूत 12 चौकारांसह या 93 धावा केल्या.
तो बाद झाल्यावर पहिल्या कसोटीत सामनावीर ठरलेला सॅम करनने वोक्सला चांगली साथ देताना दिवसाखेर नाबाद 22 धावा केल्या आहेत.
या सामन्याचा तिसरा दिवस खराब प्रकाशझोतामुळे इंग्लंडच्या पहिल्या डावातील 81 षटकांनंतर थांबवण्यात आला.
संक्षिप्त धावफलक:
भारत पहिला डाव: सर्वबाद 107 धावा
इंग्लंड पहिला डाव: 6 बाद 357 धावा
(ख्रिस वोक्स(120) आणि सॅम करन(22) नाबाद खेळत आहेत)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–किरॉन पोलार्डच्या बाबतीत झाला आहे हा खास योगायोग
–सौरव गांगुली होणार बीसीसीआयचा अध्यक्ष?
–अँडरसनचा तो चेंडू खेळायचा कसा? हरभजनचा सचिन तेंडुलकरला प्रश्न