मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिल्या कसोटीला बुधवारपासून सुरुवात झाली. आयसीसीने जारी केलेल्या नव्या दिशानिर्देशानुसार या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयसीसीने नवे दिशानिर्देश लागू केले आहेत. मात्र वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना या नव्या नियमाचा सतत विसर पडत असल्याचे दिसून येत आहे.
सामन्याच्या पहिल्याच दिवशी कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक झाल्यानंतर शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला होता. त्यानंतर शेनन गॅब्रियल याने डॉमला त्रिफळाचीत बाद केल्यानंतर पूर्वीसारखा आनंद व्यक्त करण्यासाठी वेस्ट इंडीजचे खेळाडू जमा झाले. मात्र पंचांनी यांची आठवण करून दिल्यानंतर पुन्हा खेळाडूंनी सोशल डिस्टन्स ठेवले.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही शेनॉन गॅब्रियल याने डेन्ली याला त्रिफळाचीत बाद केल्यानंतर वेस्टइंडीजचे खेळाडू एकमेकांना टाळी देऊन आनंद व्यक्त करत होते. वास्तविक पाहता, बळी घेतल्यानंतर अथवा शतक साजरे केल्यानंतर खेळाडूंनी एकमेकांच्या जवळ येऊन आनंद व्यक्त करता येत नाही, तरी देखील वेस्ट इंडीजचे खेळाडू बळी घेतल्यानंतर एकमेकांना टाळी देत आनंद व्यक्त करत आहेत. असे कृत्य करणे म्हणजे आयसीसीच्या नियमा विरोधात आहे.
या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 204 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने दमदार सुरुवात करत दुसऱ्या दिवसअखेर 1 बाद 57 धावा केल्या आहेत.