मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटच्या सर्व मालिका आणि अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या होत्या. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात होणार्या कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेला 8 जुलैपासून सुरुवात होणार आहे. साउथॅप्टन येथे पहिला कसोटी तर दुसरा आणि तिसरा कसोटी सामना मँचेस्टर येथे आयोजित केला आहे.
इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या कसोटीस ‘द रुथ स्ट्रॉस फाउंडेशन टेस्ट’ असे नाव देण्यात आल्याची माहिती इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने गुरुवारी याची घोषणा केली.
या सामन्यात खेळाडू रुथ स्ट्रॉस फाउंडेशनचे कसोटी टी शर्ट आणि लाल टोपी घालून मैदानात उतरतील. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरील सर्व जाहिरातींना लाल रंग देण्यात येणार आहे. स्टॅम्प आणि बाऊंड्री बोर्ड देखील लाल रंगाचे असतील. यातून मिळणारी रक्कम ही रुथ स्ट्रॉस फाउंडेशनला देण्यात येणार आहे. हे फाऊंडेशन कर्करोगाशी संबंधित काम करते.
या फाउंडेशनची स्थापना इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्रु स्ट्रॉसने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ केले होते. 2018 साली त्याच्या पत्नीचे निधन कर्करोगाने झाले होते. स्ट्रॉस म्हणाला, “गेल्या वर्षी क्रिकेटकडून मिळालेल्या पाठिंब्याचा मला अभिमान वाटतो. आम्हाला आशा आहे की, स्ट्रॉस फाउंडेशनच्या समर्थनात क्रिकेट रेड फॉर रुथसाठी उदारतेची भावना दाखवली.”






