मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना शुक्रवारी ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू झाला. ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिल्या कसोटीत दारुण पराभव झाल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिकेत कमबॅक केले.
24 जुलैपासून मँचेस्टर येथे सुरु झालेल्या अंतिम कसोटी सामन्यात दोन्ही संघ सर अँड्र्यू स्ट्रॉसची दिवंगत पत्नी रुथच्या सन्मानार्थ लाल रंगात दिसतील. खेळाडू लाल रंगाच्या टोपी घालतील. शर्टवरील लाल लोगो, स्टम्प आणि बाउंड्री होर्डिंग्जवरही लाल रंग दिसून येईल. या कसोटीला ‘द रूथ स्ट्रॉस फाउंडेशन टेस्ट’ असे नावही देण्यात आले आहे.
2018 मध्ये ऍन्ड्रू स्ट्रॉस याची पत्नी रूथ कर्करोगाने मरण पावली. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस यांनी या प्रकारच्या आजाराचे संशोधन करण्यासाठी आणि पीडित व्यक्तींच्या कुटूंबाला मदत करण्यासाठी एका धर्मादाय संस्थेची स्थापना केली. पत्नीच्या आजारामुळे स्ट्रॉसने इंग्लंड क्रिकेटच्या संचालकपदाचा राजीनामा देखील दिला होता.
स्ट्रॉसही या कसोटी सामन्यात समालोचन करणार आहे. स्ट्रॉस असेही म्हणाले की, ‘या महामारीमुळे या चॅरिटीवर प्रभाव होणार आहे.’ तथापि, तो आशावादी आहे की आपल्या गरजेच्या लोकांना आधार देण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात पैसा उभा करू शकतील.
स्ट्रॉस यांनी इंग्लंडकडून 100 कसोटी, 127 एकदिवसीय आणि 4 टी -20 सामन्यामध्ये भाग घेतला होता.