ऑकलंड। आज(१० नोव्हेंबर) इडन पार्क, ऑकलंड येथे पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघातील पाचव्या आणि निर्णायक टी२० सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडवर मात केली.
या सामन्यात निर्धारित ११-११ षटकांनंतर बरोबरी झाली होती. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये प्रथम इंग्लंडने फलंदाजी करताना १७ धावा केल्या. त्यांच्याकडून जॉनी बेअरस्टोने ८ आणि ओएन मॉर्गनने ९ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून प्रभारी कर्णधार टीम साऊथीने गोलंदाजी केली
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये १ बाद ८ धावाच करता आल्या. न्यूझीलंडकडून सिफर्टने ६ धावा केल्या तर गप्टिलने १ धाव केली. तसेच १ वाईड बॉलची अतिरिक्त धाव न्यूझीलंडला मिळाली. इंग्लंडकडून सुपर ओव्हरमध्ये ख्रिस जॉर्डनने गोलंदाजी केली.
तत्पूर्वी पावसाच्या व्यत्ययामुळे ११-११ षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १४६ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून मार्टिन गप्टीलने तुफानी फटकेबाजी करताना २० चेंडूत ५० धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ३ चौकार आणि ५ षटकार मारले.
त्याचबरोबर त्याला कॉलीन मुनरोने चांगली साथ दिली. मुनरोने २ चौकार ४ षटकारांच्या सहाय्याने २१ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. मुनरो आणि गप्टिलने ५.१ षटकात तब्बल ८३ धावांची सलामी भागीदारी रचली.
त्यानंतर सिफर्टनेही फटकेबाजी करताना १६ चेंडूत ५ षटकारांच्या मदतीने ३९ धावांची खेळी केली. या तिघांनी केलेल्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडने ११ षटकात १४६ धावांची धावसंख्या गाठली.
इंग्लंडकडून सॅम करन, टॉम करन, आदील राशिद आणि साकिब मेहमुदने प्रत्येकी १ विकेट घेतली.
यानंतर १४७ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. त्यांनी सलामीवीर फलंदाज टॉम बॅन्टनची विकेट लवकर गमावली. त्यापाठोपाठ लगेचच जेम्स विन्सही बाद झाला. त्यानंतर कर्णधार मॉर्गन आणि जॉनी बेअरस्टोने इंग्लंडचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतू मॉर्गनला ट्रेंट बोल्टने १७ धावांवर बाद केले.
मात्र बेअरस्टोने त्याच्या खेळ सुरु ठेवला होता. त्याने युवा सॅम करनला साथीला घेत चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली. पण बेअरस्टो १८ चेंडूत ४७ धावा करुन बाद झाला. त्याने या खेळीत २ चौकार आणि ५ षटकार मारले. त्यानंतरही इंग्लंडचे लेविस ग्रेगोरी(६) आणि टॉम करन(११) लवकर बाद झाले.
अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी १६ धावांची गरज होती. यावेळी सॅम बिलिंग्स आणि टॉम करन फलंदाजी करत होते. पहिल्या दोन चेंडूवर बिलिंग्सने ३ धावा काढल्या. परंतू जेम्स निशामने या षटकात तिसऱ्या चेंडूवर करनला बाद केले. पण नंतर फलंदाजीसाठी आलेल्या जॉर्डनने ३ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह १२ धावा करत इंग्लंडला बरोबरी साधून दिली.
इंग्लंडनेही ११ षटकात ७ बाद १४६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्ट, जेम्स निशाम आणि मिशेल सँटेनरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर टिम साऊथीने १ विकेट घेतली.
इंग्लंडने या सामन्यातील विजयाबरोबरच पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-२ अशा फरकाने विजय मिळवला.
चाहत्यांना आठवला २०१९ विश्वचषकाचा अंतिम सामना –
१४ जूलैला २०१९च्या विश्वचषकाचा अंतिम सामनाही इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड असाच रंगला होता. या सामन्यात निर्धारित ५०-५० षटकानंतर बरोबरी झाली होती. विशेष म्हणजे त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्येही या दोन्ही संघाची धावसंख्या बरोबरीतच होती. त्यामुळे अखेर बाऊंड्री काउंट नियमाचा वापर करत इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले होते.
लग्न सोडून क्रिकेट पाहत असलेल्या नवविवाहीत जोडप्यांचा फोटो झाला वायरल.
वाचा 👉 https://t.co/G87ijKtUKJ 👈 #म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 9, 2019
ओव्हरमधील पहिल्या ३ चेंडूवर षटकार मारलेल्या रोहितला पुढे काय करायचे होते पहाच…
वाचा – 👉https://t.co/CHiT23OOkw👈#म #मराठी #Cricket #INDvBAN @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 9, 2019