इंग्लंड संघाचा युवा फलंदाज झॅक क्राऊलेने इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या कसोटीत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात ३९३ चेंडूंचा सामना करताना २६७ धावांची द्विशतकी खेळी केली आहे. यामध्ये १ षटकार आणि ३४ चौकारांचा समावेश आहे. यासोबतच त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
आपला ८वा कसोटी सामना खेळत असलेल्या क्राऊलेने कारकिर्दीत पहिल्यांदाच १०० धावांना गवसणी घातली आहे. सोबतच तो इंग्लंड संघाकडून सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणाऱ्या अव्वल १० फलंदाजांमध्ये सामील झाला आहे. त्याने जेफ्री बॉयकॉट, सध्याचा कर्णधार जो रूट आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला मागे टाकले आहे.
क्राऊलेने कसोटी कारकिर्दीच्या १२ व्या डावात द्विशतक करण्याचा कारनामा केला आहे. इंग्लंड संघाकडून सर्वात कमी डावांमध्ये असा कारनामा करणाऱ्या बिल इद्रिचसोबत तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे टिप फोस्टी (पहिल्या डावात), डेव्हिड लॉयड (दुसऱ्या डावात) आणि लेन हटन (९व्या डावात) हे खेळाडू आहेत.
२२ वर्षे आणि २०१ दिवसांच्या वयात द्विशतक ठोकत क्राऊले कसोटीत द्विशतक ठोकणारा इंग्लंडचा तिसरा सर्वात युवा फलंदाजही बनला आहे. त्याच्यापूर्वी १९७९मध्ये डेव्हिड गॉवर यांनी २२ वर्षे १०३ दिवसांच्या वयात भारताविरुद्ध एजबॅस्टनमध्ये द्विशतक ठोकले होते. त्याचबरोबर पहिल्या क्रमांकावर लेन हटन असून त्यांनी २२ वर्षे आणि ६० दिवसांच्या वयात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९३८ साली द्विशतक ठोकले होते.
क्राऊलेने जॉस बटलर (नाबाद १३८ धावा) सोबत ५व्या विकेटसाठी ३५९ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी इंग्लंड संघाकडून ५व्या विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी आहे. या दोन्ही फलंदाजांनी कीथ फ्लेचर आणि टोनी ग्रेग यांना मागे टाकले आहे. ज्यांनी फेब्रुवारी १९७३ मध्ये भारताविरुद्ध मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअममध्ये २५४ धावांची भागीदारी केली होती. ही इंग्लंडकडून करण्यात आलेली ६वी सर्वात मोठी भागीदारीही आहे.
क्राऊले आणि बटलर लंचनंतर एकत्र फलंदाजी करण्यासाठी आले होते. त्यावेळी इंग्लंड संघाचा डाव ४ बाद १२७ धावांवर होता. क्राऊलेने नसीम शाहच्या चेंडूवर चौकार ठोकत ३३१ चेंडूत द्विशतक ठोकले होते.
इंग्लंडने दुसऱ्या दिवसाची सुरुवात ४ बाद ३३२ धावांवरून केली होती. इंग्लंडने ३ सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली असून ते मागील १० वर्षांमध्ये पहिल्यांदा पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत.
इंग्लंड संघाकडून कसोटीत द्विशतक ठोकणारे युवा खेळाडू
१. २२ वर्षे ५८ दिवस, लेन हटन, ३६४ धावा, विरुद्ध- ऑस्ट्रेलिया, द ओव्हल- १९३८
२. २२ वर्षे १०२ दिवस, डेव्हिड गॉवर, २००* धावा, विरुद्ध- भारत, एजबॅस्टन- १९७९
३. २२ वर्षे २०० दिवस, झॅक क्राऊले, २६७ धावा, विरुद्ध- पाकिस्तान, साउथँम्पटन- २०२०
४. २२ वर्षे ३४२ दिवस, बिल एडरिच, २१९ धावा, विरुद्ध- दक्षिण आफ्रिका, डर्बन- १९३९
क्राऊलेचाही झाला विराट कोहली आणि रोहित शर्माच्या यादीत समावेश
क्राऊलेपूर्वी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमध्ये ६ फलंदाजांनी द्विशतक ठोकले आहे. यामध्ये सर्वात पहिला क्रमांक लागतो तो स्टिव्ह स्मिथचा. त्यानंतर मयंक अगरवाल, विराट कोहली, रोहित शर्मा या भारतीय खेळाडूंनी द्विशतक ठोकले आहे, तर ऑस्ट्रेलियाचे मार्नस लॅब्यूशाने आणि डेव्हिड वॉर्नर या फलंदाजांनीही असा कारनामा केला आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमध्ये द्विशतक ठोकणारे फलंदाज
१. स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध इंग्लंड
२. मयंक अगरवाल (भारत) विरुद्ध दक्षिण आफ्रिका
३. विराट कोहली (भारत) विरुद्ध दक्षिण आफ्रिका
४. रोहित शर्मा (भारत) विरुद्ध दक्षिण आफ्रिका
५. मयंक अगरवाल (भारत) विरुद्ध बांगलादेश
६. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध पाकिस्तान
७. मार्नस लॅब्यूशाने (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध न्यूझीलंड
८. झॅक क्राऊले (इंग्लंड) विरुद्ध पाकिस्तान
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ४ संघ, ज्यांचे गोलंदाजी आक्रमण आहे सर्वात मजबूत
-आज आहेत या दोन भारतीय महिला क्रिकेटपटूंचे वाढदिवस!
महत्त्वाच्या बातम्या-
-विराट-सचिनची बॅट बनवणारा कारागीर अडचणीत; सोनू सूदने केला मदतीसाठी हात पुढे
-‘फेब्रुवारी २०२१ मध्ये भारत इंग्लंडचे यजमानपद सांभाळेल आणि एप्रिलमध्ये आयपीएलचा १४ वा हंगाम होईल’
-सुनील गावस्कर यांचे मोठे विधान; मलाही रोहित शर्मासारखा फलंदाज व्हायला आवडेल