लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून(१२ ऑगस्ट) सुरु झाला आहे. या सामन्याचा शुक्रवारी (१३ ऑगस्ट) दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात ४५ षटकांत ३ बाद ११९ धावा केल्या आहेत. अजून इंग्लंड २४५ धावांनी पिछाडीवर आहे.
या दिवशी भारताचा पहिला डाव ३६४ धावांवर संपुष्टात आला, त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडकडून रॉरी बर्न्स आणि डॉमनिक सिब्लीने डावाची सुरुवात केली. त्यांनी दुसरे सत्र संपेपर्यंत संयमी फलंदाजी करत विकेट जाऊ दिली नाही. त्यामुळे दुसऱ्या सत्राखेरपर्यंत इंग्लंडने १४ षटकात बिनबाद २३ धावा केल्या.
मात्र, तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु होताच इंग्लंडला २ मोठे धक्के बसले. मोहम्मद सिराजने गोलंदाजी केलेल्या १५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सिब्ली ११ धावांवर केएल राहुलकडे झेल देऊन बाद झाला. तर त्याच्या पुढच्याच चेंडूवर सराव सामन्यात शतक करणारा हसीब हमीदला सिराजने त्रिफळाचीत केले. त्यामुळे इंग्लडची अवस्था १५ षटकांत २ बाद २४ धावा अशी झाली.
पण, यानंतर कर्णधार जो रुट आणि सलामीवीर रॉरी बर्न्स यांनी इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी धावफलक हलता ठेवत तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे इंग्लंडने १०० धावांचा टप्पा सहज ओलांडला. या दरम्यान भारताचे २ रिव्ह्यू देखील वाया गेले. पण, ही भागीदारी तुटली नाही. अखेर दुसऱ्या दिवसाचा खेळ शेवटाकडे जात असतानाच ४२ व्या षटकात बर्न्स मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यामुळे त्याचे अर्धशतक केवळ १ धावेने हुकले. तो ४९ धावांवर बाद झाला. पण यानंतर रुटला जॉनी बेअरस्टोने साथ दिली. या दोघांनी दिवाखेरपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. दिवसाखेर रुट ४८ धावांवर आणि बेअरस्टो ६ धावांवर नाबाद आहेत.
भारताच्या पहिल्या डावात ३६४ धावा
भारताचा पहिला १२६.१ षटकात ३६४ धावांवर संपुष्टात आला आहे. भारताकडून पहिल्या डावात केएल राहुलने १२९ धावांची शतकी खेळी केली. तर रोहित शर्माने ८३ धावांची शतकी खेळी केली. त्याचबरोबर विराट कोहली (४२), रविंद्र जडेजा (४०) आणि रिषभ पंत (३७) यांनी छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर ऑली रॉबिन्सन आणि मार्क वूडने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मोईन अलीला १ विकेट मिळाली.
जडेजाची संयमी खेळी
पहिल्या सत्राखेरपर्यंत ७ विकेट्स गमावल्यानंतर दुसऱ्या सत्रात भारताकडून रविंद्र जडेजाला इशांत शर्माने चांगली साथ दिली होती. मात्र, इशांत ८ धावांवर जेम्स अँडरसनविरुद्ध १२४ व्या षटकात बाद झाला. पाठोपाठ जसप्रीत बुमराहलाही अँडरसननेच शुन्यावर बाद केले. अखेर १२७ व्या षटकात मार्क वूडने जडेजाला अँडरसनकरवी झेलबाद करत भारताचा डाव ३६४ धावांवर संपवला. जडेजाने १२० चेंडूत ३ चौकारासंह ४० धावा केल्या.
पहिल्या सत्रात भारताला मोठे धक्के
दुसऱ्या दिवशी भारताकडून पहिल्या डावातील खेळ पुढे नेण्यासाठी ‘शतकवीर’ केएल राहुल आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात उतरले. दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावातील ९० षटके आणि ३ बाद २७६ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली.
पण दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच आणि भारताच्या ९१ व्या षटकात केएल राहुलला ऑली रॉबिन्सनने बाद केले. राहुलचा झेल डॉम सिब्लीने घेतला. राहुलने या डावात शतकी खेळी करताना २५० चेंडूत १२ चौकार आणि १ षटकारासह १२९ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ ९२ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणेला जेम्स अँडरसनने जो रुटकडे झेल देण्यास भाग पाडले. रहाणे १ धावेवर झेलबाद झाला.
यानंतर मात्र, रिषभ पंत आणि रविंद्र जडेजाने भारताचा डाव सावरला. या दोघांनी काही आक्रमक पण सावध फलंदाजी करताना भारताला ३०० धावांचा टप्पा पार करुन दिला. पण, ही भागीदारी रंगत असतानाच पंतला मार्क वूडने जॉस बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले. पंत ११० व्या षटकात ५८ चेंडूत ५ चौकारांसह ३७ धावा करुन बाद झाला. त्याच्यापोठापाठ काही वेळात १११ व्या षटकात मोईन अलीने मोहम्मद शमीला शुन्यावर बाद करत भारताला ७ वा धक्का दिला. असे असले तरी एक बाजू रविंद्र जडेजाने सांभाळून ठेवली आहे.
भारताने पहिल्या सत्राखेर ११६ षटकात ७ बाद ३४६ धावा केल्या आहेत. रविंद्र जडेजा ३१ धावांवर नाबाद असून त्याच्यासह इशांत शर्मा फलंदाजी करत आहे.