शारजा येथे झालेल्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभूत करत कोलकाता नाईट रायडर्सने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये जागा बनवली. दुसरा क्वालिफायर सामना बुधवारी (१३ ऑक्टोबर) खेळला जाईल. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर कोलकाताचा कर्णधार ओएन मॉर्गनकडे कोलकाताचा माजी कर्णधार गौतम गंभीर याची बरोबरी करण्याची संधी असेल.
मॉर्गनचा खराब फॉर्म
केकेआरचा संघ क्वालिफायर २ मध्ये पोहोचला असला तरी, कर्णधार ओएन मॉर्गनला चालू हंगामात आतापर्यंत एकही अर्धशतक करता आले नाही. त्याने १५ सामन्यांमध्ये १३ च्या सरासरीने १२९ धावा केल्या आहेत. त्यात त्याने नाबाद ४७ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली होती. त्याचा स्ट्राइक रेट १०१ आहे. हे देखील टी२० च्या दृष्टीने चांगले मानले जाऊ शकत नाही. गेल्या हंगामात दिनेश कार्तिकच्या जागी मॉर्गनला कर्णधार बनवण्यात आले होते. केकेआरने दोन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये जेतेपद पटकावण्यात संघ यशस्वी झाला. दोन्ही वेळा संघाचे नेतृत्व गंभीरकडे होते. या हंगामात विजेतेपद पटकावून, संघाला सात वर्षानंतर पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून देत गंभीरच्या कामगिरीची बरोबरी करण्याची संधी मॉर्गनकडे आहे.
अशी आहे आयपीएल कारकीर्द
इंग्लंडला वनडे विश्वचषक जिंकून देणाऱ्य मॉर्गनला आयपीएलमध्ये कधीही फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याला लीगच्या इतिहासातील ८१ सामन्यांमध्ये केवळ ५ अर्धशतके झळकावता आली आहेत. त्याने आतापर्यंत २३ च्या सरासरीने १४०१ धावा केल्या असून, त्याचा स्ट्राइक रेट १२३ आहे. २०२० चा हंगाम त्याच्यासाठी आजवर सर्वोत्तम ठरला होता. त्याने १४ सामन्यांमध्ये ४२ च्या सरासरीने ४१८ धावा केलेल्या.
पार करावे लागणार दिल्लीचे आव्हान
आयपीएल २०२१ च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी केकेआरला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्लीचे आव्हान पार करावी लागेल. दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. मात्र, पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांना चेन्नईकडून पराभूत व्हावे लागले होते. हा सामना जिंकून सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरी खेळण्याचे ध्येय दिल्ली संघाचे असेल.