नाशिक। एव्हरशाईन स्पोर्टस् अॅकॅडमीतर्फे आयोजित ‘एव्हरशाईन प्रोफेशनल कप 2019’ स्पर्धेत दुसऱ्या दिवशी तीन सामने झाले. संदीप फाउंडेशनच्या क्रिकेट ग्राउंडवर खेळवले गेलेले हे तीनही सामने चुरशीचे झाले. यात एव्हरशाईन स्पोर्ट्सच्या संघाने टीम गर्जनावर 51 धावांनी पराभव करत स्पर्धेत आघाडी घेतली. एव्हरशाईनचे 145 धावांचे आव्हान गर्जनाच्या फलंदाजांना 94 धावांपर्यंत सीमित ठेवत सामन्यावर वर्चस्व ठेवले. एव्हरशाईनच्या मनोज कंत्री यांनी ५ बळी मिळवत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा असल्याने त्यांना सामनावीराच्या किताबाने गौरविण्यात आले. तत्पूर्वी ब्रिजमोहन लोंगाणी (35 धावा), कर्णधार संतोष दिंडे (29 धावा), तुषार चव्हाण (21 धावा) यांच्या बळावर 145 धावांचा डोंगर रचला.
नाशिक जिमखान्याच्या संघाने एका सामन्यात टीम सनराईज स्पोर्ट्स अकॅडमीवर 9 धावांनी विजय मिळवला. अटीताटीच्या झालेल्या या सामन्यात सामनावीर शंतनू वानखेडे यांच्या 10 चेंडूतील 25 धावांमुळे जिमखाना संघाला समाधानकारक धावसंख्या उभारता आली. सोबतच महेध धावरे यांच्या तीन बलींसह शंतनू यांनी 2 बळी घेत संघाला विजयापर्यंत पोहचवले. सनराईजच्या अरुण शेळके वगळता कोणालाही मोठी खेळी करता आली नाही.
दुसऱ्या सामन्यात टीम एनसीए कडून पराभव मात्र नाशिक जिमखाना संघाला पत्करावा लागला. 15 षटकांत 113 धावसंख्या टीम एनसीएच्या सामनावीर ठरलेल्या अमित पाटील (38 धावा) आणि कर्णधार नितीन धात्रक (37 धावा) या सलामीवीर जोडीच्या कामगिरीच्या बळावर 11.2 षटकांत आरामात पार केले.
टीम सीसीएन आणि एनडीसीए सिनिअर्स संघ आपापल्या गटात अग्रस्थानी असून स्पर्धेत आतापर्यंत 176 चौकार आणि 23 सत्कार मारले गेले आहेत.
या स्पर्धेत एनडीसीए सिनिअर, सीसीएन, सनराईज, एनसीए, टीम गर्जना, नाशिक जिमखाना, एव्हरशाईन डॉक्टर्स या 8 संघांतील 120 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेल्या असून 2019च्या पर्वाचा अंतिम सामना रविवारी (दि. 3) दुपारी 2 वाजता संदीप फाउंडेशनच्या क्रिकेट ग्राउंडवर 20-20 षटकांचा होणार आहे.
एव्हरशाईन प्रोफेशनल कप’ मध्ये 35 वर्षावरील डॉक्टर्स, सी.ए., आयआरएस ऑफीसर्स, वकील, आर्किटेक्ट, उद्योजक, एनडीसीए, सीसीएन या क्षेत्रात काम करणारे व खेळाची आवड असणार्यांचा समावेश आहे.
यासाठी एचडीएफसी बँक, सनराईज हॉस्पीटल, स्पर्श हॉस्पीटल, साई हाय टेक डायग्नोस्टीक, डीसीबी बँक, साफल्य हॉस्पीटल, शिवकला इमॅजिंग, तेजस्वी ज्वेलर्स यांचे सहकार्य लाभले आहे.
या मॅचेसचे लाईव्ह स्कोवर ‘क्रीक हिरोज’ या अॅपवर बघू शकता. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मिलिंद गांगुर्डे, संतोष दिंडे, जितेंद्र शाह, विनोद कर्डीले, निलेश सिंग आदी मेहनत घेत आहेत.