भारताच्या १९ वर्षाखालील संघाने (india u19) शनिवारी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकला आणि जेतेपद पटकावले. भारतीय युवा संघाने इंग्लंडवर चार विकेट्स राखून विजय मिळवला. कर्णधार यश धूल (yash dhull) याच्या नेतृत्वातील संघाने सुरुवातील अप्रतिम गोलंदाजी केली आणि नंतर सहज लक्ष्य गाठले. ही पाचवी वेळ आहे जेव्हा भारतीय संघाने १९ वर्षाखालील विश्वचषकाची ट्रॉफी जिंकली. विजेतेपदानंतर यश धूलने स्पर्धेत खेळाडूंनी स्वतःच्या डायटविषयी घेतलेल्या काळजीची माहिती दिली आहे.
विजयानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत यश धूलने सांगितले की, “खेळाडूंना आता आईस्क्रीम खायची परवानगी मिळाली आहे. विश्वचषक स्पर्धदरम्यान सर्व खेळाडूंनी स्वतःच्या डायटची पूर्ण काळजी घेतली होती. यादरम्यान त्यांना आईस्क्रीम न खाण्याची सक्ती केली गेली होती. मात्र, आता त्यांना आईस्क्रीम खाऊ घातली गेली आहे.” धूल म्हणाला की, “प्रत्येक खेळाडूच्या रूममध्ये आईसक्रीम पोहोचली आहे. आता आम्ही त्याचा आनंद घेऊ शकतो. या स्पर्धेसाठी आम्ही खूप कडक डायट पाळला होता, त्यामुळे आम्ही आता आईस्क्रीम खाणार आहोत.”
दरम्यान, विश्वचषकाचा अंतिम सामना अँटिग्वाच्या सर विवियन रिचर्ड्सन स्टेडियमवर खेळला गेला. भारताने या सामन्यात इंग्लंडला चार विकेट्स राखून धूळ चारली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. अष्टपैलू राज बावा (५ विकेट्स) आणि रवी कुमार (४ विकेट्स) यांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंड संघ अवघ्या १८९ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने ४८ व्या षटकात विजय मिळवला.
यश धूल भारताला १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकवून देणाऱ्या दिग्गज कर्णधारांमध्ये सामील झाला आहे. भारताच्या युवा संघाने यापूर्वी २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली विश्वचषक जिंकला होता. यश धूलच्या आधी मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद आणि पृथ्वी शॉ या कर्णधारांनी ही कामगिरी केली होती.
महत्वाच्या बातम्या –
U19 वर्ल्डकप: कोण-कोण राहिले स्पर्धेतील ‘अव्वल नंबरी’; वाचा संपूर्ण यादी
PRO KABADDI: पटना पायरेट्स टॉपवर; गुजरातविरूद्ध बेंगलोरचा धसमुसळा खेळ
रोहितच्या नेतृत्वात २०२२ मध्ये फुटला टीम इंडियाच्या विजयाचा नारळ; वेस्ट इंडीजवर केली ६ गड्यांनी मात