टी२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाचा मार्ग कठीत झाला आहे. कारण, संघाने आत्तापर्यंत ३ पैकी २ सामने पराभूत झाले आहेत, तर एक सामना जिंकला आहे. वेस्टइंडिजच्या एव्हिन लुईसने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तुफानी अर्धशतक झळकावले होते. पण त्याचे प्रयत्न कमी पडले आणि वेस्ट इंडिजला पराभवाचे तोंड पाहावे लागले. दरम्यान, एव्हिन लुईसने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सर्वकालीन प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. त्याने आपल्या संघात ५ भारतीय खेळाडूंना स्थान दिले.
लुईसने त्याच्या सर्वकालीन आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांची सलामीवीर म्हणून निवड केली. रोहितने २८६४ धावा केल्या आहेत, ज्यात ४ शतकांचा समावेश आहे आणि गेलने २ शतकांच्या मदतीने १८७९ धावा केल्या आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर दिग्गज एबी डिव्हिलियर्स चौथ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी२० प्रकारामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ३२१६ धावा केल्या आहेत. डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १३५ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने १६७२ धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड संघात पाचव्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी यष्टिरक्षक आणि कर्णधार म्हणून लुईसच्या संघात असेल. धोनीने २००७ साली भारतीय संघाला टी२० विश्वचषक जिंकून दिला होता.
आंद्रे रसेल आणि रवींद्र जडेजा हे लुईसच्या सार्वकालीन टी२० मध्ये स्थान मिळवणारे दोन अष्टपैलू खेळाडू आहेत. जडेजा हा भारतीय टी२० संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज असून त्याने टी२० मध्ये २३० धावा केल्या आहेत आणि ३९ बळी घेतले आहेत. आंद्रे रसेलने वेस्ट इंडिजसाठी ६४ टी- २० सामन्यांमध्ये १५५.३९ च्या स्ट्राइक रेटने ७२१ धावा केल्या आहेत.
लुईसने गोलंदाज म्हणून राशिद खान, जसप्रीत बुमराह आणि मिशेल स्टार्क यांचा समावेश केला आहे. रशीद खान टी-२० मध्ये चौथा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे आणि त्याने केवळ ५२ सामन्यांमध्ये १२.२१ च्या सरासरीने ९९ बळी घेतले आहेत. जसप्रीत बुमराहने भारतीय संघासाठी ५१ टी-२० सामने खेळले असून त्यात त्याने ५९ बळी घेतले आहेत.
एव्हिन लुईसचा सर्वकालीन टी२० संघ : ख्रिस गेल, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, कायरण पोलार्ड, एमएस धोनी, आंद्रे रसेल, रवींद्र जडेजा, राशिद खान, जसप्रीत बुमराह, मिशेल स्टार्क
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय वंशाचा किवी गोलंदाज टीम इंडियासाठी ठरणार मोठी डोकेदुखी? टी२०मध्ये घेतल्यात सर्वाधिक विकेट्स