मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारताचा श्रीलंका दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिली आहे. या महिन्यात भारताचा नियोजित श्रीलंका दौरा होता. या दौऱ्यात भारतीय संघ तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळाणार होता.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्रीडा स्पर्धांना स्थगिती देण्यात आली आहे. यासोबत कोणत्याही क्रीडा स्पर्धा भरवण्यासाठी भारत सरकारची परवानगी घेणं अत्यावश्यक आहे. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता भारत सरकार कोणत्याही स्पर्धेला परवानगी देईल याची शाश्वती कमी आहे.
मध्यंतरी भारत जून ऐवजी ऑगस्टमध्ये श्रीलंकेचा दौरा करेल, अशा बातम्या समोर येत होत्या. या मालिकेसाठी श्रीलंकेच्या खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. मात्र, भारतीय खेळाडूंना अद्याप सरावाची संधी मिळाली नाही. बीसीसीआय भारतीय संघाच्या सरावासाठी आणि क्रिकेट मालिकांच्या नियोजनासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहे.
जगातील सर्वच क्रिकेटप्रेमी क्रिकेट सामन्यांची आतुरतेने वाट पाहत आहे. पुढील महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिका होणार आहे. हा दौरा जर यशस्वी ठरला तर इतर क्रिकेट बोर्ड देखील क्रिकेट सामने भरवण्याचा विचार करु शकतील.