वेस्ट इंडीज संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दौऱ्यात पाकिस्तान संघाविरुद्ध वेस्ट इंडीजला तीन टी२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. १४ डिसेंबरला खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात पाकिस्तानने ९ धावांनी विजय मिळवला. हा सामना पाहण्यासाठी मैदानात आलेल्या प्रेक्षकांची संख्या खूपच कमी होती. आता याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अकरम (wasim akram) यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर निशाणा साधला आहे.
पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजमधील पहिला आणि दुसरा टी२० सामना कराचीमध्ये खेळला गेला आहे. या सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये आलेल्या प्रेक्षकांची संख्या खूप कमी असल्यामुळे वसीम अक्रम निराश आहेत. अक्रम यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून ट्वीट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये पीसीबीला या सामन्यादरम्यान प्रेक्षक स्टेडियममध्ये का उपस्थित नव्हते? असा थेट प्रश्न विचारला आहे.
मागच्या महिन्यात पार पडलेल्या टी२० विश्वचषकात पाकिस्तानने अप्रतिम प्रदर्शन केले होते. तरीदेखील आता चाहते पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिले नसल्यामुळे अक्रम यांनी आश्चर्य व्यक्त केले. अक्रम यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजमधील टी२० सामन्यादरम्यान मोकळे स्टेडियम पाहून मला खूप वाईट वाटत आहे. मागच्या महिन्यात पाकिस्तानचे प्रदर्शन एवढे चांगले राहिले होते. पण तरीही स्टेडियम मोकळे आहे. मला तर माहिती आहे की गर्दी का झाली नाही. पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की, गर्दी कुठे आहे ?”
दरम्यान, उभय संघात खेळल्या जात असलेल्या टी२० मालिकेत पाकिस्तानने त्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन कायम ठेवले आहे. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडीज संघाला मात देत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या सामन्याचा विचार केला, तर पाकिस्तानने यामध्ये ९ विकेट्स राखून विजय मिळवला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने ८ विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावा केल्या होत्या. त्यानंतर वेस्ट इंडीज संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकात १६३ धावांपर्यंत मजल मारली आणि परिणामी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
महत्वाच्या बातम्या –
ऍशेसच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा १२ सदस्यीय संघ घोषित; दिग्गज दुकलीचे पुनरागमन
मोठ्या मनाचा नटराजन; स्वतःच्या गावकऱ्यांसाठी बनवतोय दर्जेदार क्रिकेट मैदान
दोन हातांनी गोलंदाजी करणार्या भारतीय गोलंदाजांची ऑस्ट्रेलियन संघात निवड; आयपीएलमध्ये होता नेट बॉलर