Suryakumar Yadav Captaincy : भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्त्वाखाली संघाने 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. असे असतानाही, न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरिस याने सूर्यकुमारच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
रोहित शर्माने आयसीसी टी20 विश्वचषक 2024 नंतर क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपातून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर टी20 फॉरमॅटमध्ये भारताचा पुढचा कर्णधार कोण असेल?, हा प्रश्न होता. अशा परिस्थितीत नवे प्रशिक्षक गौतम गंभीर आल्यानंतर सूर्यकुमार यादवला भारतीय संघाचा नियमित टी20 कर्णधार बनवण्यात आले. सूर्याने यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेत सूर्या प्रथमच पूर्णवेळ कर्णधार झाला. श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकून त्याने दमदार सुरुवातही केली. परंतु न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिसचा असा विश्वास आहे की, सूर्या हा दीर्घकालीन कर्णधारपदासाठी योग्य पर्याय नाही.
स्कॉट स्टायरिसने ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितले की, “मला वाटते सूर्यकुमार अल्पकालीन पर्याय आहे. मला वाटत नाही की या खेळाडूंमध्ये गंभीरचा नैसर्गिक कर्णधार आहे. खरं तर, गंभीर त्याच्या आवडीचा कर्णधार शोधण्यासाठी स्वत:ला वेळ देत आहे.”
तो पुढे म्हणाला, “मला वाटते की गिलसारखा खेळाडू पुढील 10 वर्षे भारतीय संघाचे नेतृत्त्व करू शकतो. पण तो अजून तयार नाही. त्यामुळे गंभीरने काही काळासाठी सूर्यकुमारची निवड केली असावी. पण त्याने चांगली कामगिरी केली तो आगामी टी20 विश्वचषकात भारताचे नेतृत्त्व करतानाही दिसू शकतो. मग त्यानंतर शुबमन गिल किंवा इतर योग्य पर्याय शोधला जाईल. त्यामुळे मला वाटते की, थोडा अधिक अनुभव असलेल्या एखाद्याला आणणे ही खरोखरच शानदार रणनिती होती.”
हेही वाचा –
इतिहास घडला!! मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीचा कांस्यपदकावर निशाणा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणारी नेमबाजी स्पर्धा कशी खेळली जाते? नियम व अटी काय असतात?
शूटिंगमध्ये भारताच्या पदरी निराशा, पदकाच्या लढतीत 20 वर्षीय रमिता जिंदालचं स्वप्न भंगलं