भारतीय फुटबॉलचा चेहरा बनण्याचे स्वप्न घेऊन वाढलेला आणि ते सत्यात उतरवण्याचे सामर्थ्य ठेववणारा महाराष्ट्राचा लाडका खेळाडू अनिकेत जाधव याची अंडर १७ विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. महाराष्ट्राचा हा खेळाडू मागील काही काळापासून भारतीय अंडर १७ विश्वचषकासाठी निवडलेल्या संभाव्य खेळाडूंमधील एक महत्वाचा खेळाडू होता. विश्वचषकापूर्वी झालेल्या भारतीय संघाच्या युरोपीय दौऱ्यात देखील अनिकेतची कामगिरी वाखाणण्याजोगी झाली होती. अशा या महाराष्ट्राच्या मातीतील खेळाडूची महा स्पोर्ट्सने घेतलेली मुलाखत.
प्रश्न- अनिकेत तुझा फुटबॉलचा प्रवास कसा सुरु झाला?
उत्तर- मी मामाकडे रहायला होतो. त्यांनी माझे फुटबॉल खेळातील कौशल्य ओळखले. त्यांनी मला क्रीडा प्रबोधनीत जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी मला जास्त प्रेरीत केल्याने मी क्रीडा प्रबोधनीत प्रवेश घेतला. माझे गुरुजी जयदीप अंगीरवार सर यांच्याकडून मी फुटबॉलचे धडे घेतले. त्यांनी फुटबॉल खेळातील बेसिक कौशल्य मला शिकवली. माझा खरा प्रवास क्रीडा प्रबोधनीमधूनच सुरु झाला असे मी म्हणणे.
प्रश्न- फुटबॉलच खेळायचे असे तू केव्हा ठरवले?
उत्तर- तसे काही सांगता येणार नाही परंतु जेव्हा मी ८ व्या वर्षी क्रीडा प्रबोधनीत प्रवेश घेतला त्याच वेळेपासून मी ठरवले होते की मला फुटबॉलच खेळायचा आहे.
प्रश्न – अंडर १७ विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड होणार तू एकमेव महाराष्ट्रीयन खेळाडू आहेस का?
उत्तर- होय, विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेला मी पहिलाच महाराष्ट्रीयन खेळाडू आहे. या गोष्टीचा मला अभिमान आहे. पण त्याच बरोबर माझ्यावर अनेक महाराष्ट्रीयन तसेच भारतीयांचे स्वप्ने पूर्ण करण्याचा दबाब आहे. परंतु मी आनंदी आहे ही संधी मला मिळाली.
प्रश्न- भारतीय संघात स्थान मिळण्याच्या अगोदर तुझ्या फुटबॉल करियरला चालना देणारी गोष्ट कोणती?
उत्तर – पुणे एफ सी संघासाठी खेळताना मला आदीदास कपसाठी पुण्याच्या संघात निवडले गेले. त्यांनतर आम्ही जर्मनीला गेलो. या स्पर्धेत मी सर्वाधिक गोल केले. त्यावेळी मला ‘गोल्डन बूट’ पुरास्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तो क्षण माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. त्या गोष्टीमुळे मला खूप ऊर्जा मिळाली आणि चांगला खेळ करण्यासाठी प्रेरित केले.
प्रश्न- तुझ्या लॉकरमध्ये(कपाटामध्ये) मला फुटबॉल विश्वचषक खेळायचा आहे असे लिहलेले होते असे म्हणतात त्याबद्दल काय सांगशील ?
उत्तर- होय, ती एकदम खरी बाब आहे. मी हॉस्टेलमध्ये होतो त्यावेळी मी माझ्या लॉकरमध्ये तसे लिहून चिटकावले होते. त्याच्या मागचे कारण असे होते की, “मला माझे ध्येय विसरायचे नव्हते.” ज्या गोष्टीसाठी मी हे सर्व कष्ट करतोय ती गोष्ट सोडून दुसऱ्या कोणत्याच बाबीमध्ये मला रमायचे नव्हते. तसे लिहलेले मला माझ्या ध्येयाकडे जाण्यासाठी उपयोगी होणार होते. त्यामुळे मला प्रेरणा मिळत होती.
प्रश्न- फुटबॉल जगतात तू कोणाकडे आदर्श म्हणून पाहतोस?
उत्तर – मला नेमारचा खेळ खूप आवडतो. त्यातून मला शिकायला खूप मिळते. त्याची गती, त्याचे ड्रिब्लिंग कौशल्य खूप अलौकिक आहे. भारतीय खेळाडूबद्दल सांगायचे झाले तर मी सी.के. विनीत याला आदर्श मानतो. सिके विनीतची मागील काही काळातील कामगिरी मला देशासाठी काही तरी मोठे करावे यासाठी नेहमीच प्रेरित करते आहे.
प्रश्न- ग्रुप स्टेजमध्ये तुला कोणता विदेशी संघ मजबूत वाटतो?
उत्तर- मला तसे सांगता येणार नाही. आम्ही त्या गोष्टीचा विचार केला नाही. आम्हांला मैदान जाऊन आपले १०० टक्के द्यायचे आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला जास्तीत जास्त सामने जिंकून द्यायचे आहेत. मागील काही काळापासून आम्ही याच गोष्टीचा जास्त विचार करत आहोत.
प्रश्न- युरोपीय दौऱ्याचा परिणाम भारतीय संघावर कसा झाला आहे?
उत्तर- युरोपीय दौऱ्यात खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आम्ही इटली सारख्या मजबूत संघाला २-० असे हरवले. त्यामुळे भारतीय संघाचे मनोबल उंचावण्यात खूप मदत झाली आहे. अनेक मोठ्या युरोपीय संघासोबत आणि तेथील क्लबसोबत आम्ही खेळलो. आम्ही त्यांना हरवू शकतो याचा आम्हाला याच काळात विश्वास आला.
प्रश्न- तुझ्या यशाचे श्रेय कोणाला देशील?
उत्तर- माझ्या यशाचे श्रेय मी पूर्ण भारतीय फुलटबॉलच्या चाहत्यांना देतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व क्रीडाप्रेमींना देतो ज्यांनी मला वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे माझे आई-वडील, संजय जाधव (मामा), माझे सर्व गुरु ज्यांनी मला माझा खेळ विकसीत करण्यास मदत केली. त्याचबरोबर क्रीडा प्रबोधनी ज्यांच्यामुळे मी सध्या या यशाची चव चाखतो आहे.