द हंड्रेड 2023 च्या 24 व्या सामन्यात लंडन स्पिरिटने नॉर्दर्न सुपरचार्जर्सचा 13 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लंडन स्पिरिट संघाने 100 चेंडूत 6 गडी गमावून 160 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नॉर्दन सुपरचार्जर्स संघ 7 गडी गमावून 147 धावाच करू शकला. अष्टपैलू रवी बोपाराला त्याच्या जबरदस्त गोलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मागील आठ वर्षांपूर्वी इंग्लंड संघासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला बोपारा या स्पर्धेत सातत्याने चमकदार कामगिरी करताना दिसत आहे.
विजयासाठी मिळालेल्या 161 धावांचा पाठलाग करताना सुपरचार्जर्सने सुरुवात चांगली केली होती. मात्र, बोपारा गोलंदाजीला आल्यानंतर त्यांच्या फलंदाजीची वाताहात झाली. त्याने 20 चेंडू टाकताना 21 धावा देऊन चार महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले. तोच या सामन्याचा मानकरी ठरला. त्याने आतापर्यंत स्पर्धेत तीन सामने खेळताना सहा बळी मिळवले असून, त्याच्या नावे 36 धावा देखील जमा आहेत.
बोपारा हा आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2015 मध्ये खेळला आहे. वनडे विश्वचषकातील अफगाणिस्तानविरुद्धचा हा सामना त्याचा अखेरचा सामना ठरला होता. त्यानंतर तो जगभरातील विविध टी20 लीगमध्ये खेळताना दिसतो. 38 वर्षांचा असलेला बोपारा 25 पेक्षा अधिक व्यावसायिक टी20 संघासाठी खेळलेला आहे.
त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने आपल्या कारकिर्दीत 13 कसोटी, 120 वनडे व 38 टी20 सामने खेळले आहेत. इंग्लंड संघाचे नेतृत्व ऍलिस्टर कुक करत असताना, बोपारा इंग्लंड वनडे संघाचा प्रमुख सदस्य होता. मात्र, 2015 वन डे विश्वचषकात नामुष्कीरित्या संघाला पहिल्या फेरीतून बाहेर व्हावे लागल्यानंतर, ज्या खेळाडूंची हकालपट्टी करण्यात आली त्यामध्ये बोपाराचा समावेश होता.
(Experience Campaigner Ravi Boapra Shines In The Hundred)
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषकाची संधी हुकल्यानंतर ब्रूकची रिऍक्शन! म्हणाला, ‘स्टोक्स संघात आल्यामुळे मला…’
कारकिर्दीची सुरुवात अप्रतिम करणाऱ्या तिलकच्या नावावर नकोसा विक्रम, ‘या’ यादीत जोडले गेले नाव