पुणे। ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील मुष्टीयुद्धात पदकांची लयलूट करण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये निश्चितपणे आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील अनुभवाची आवश्यकता आहे, असे क्यूबाचे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध प्रशिक्षक रोमॅरो ड्रेक यांनी सांगितले.
ड्रेक हे सध्या पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स महोत्सवात सहभागी झालेल्या मध्य प्रदेश खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून आले आहेत. ड्रेक यांना जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची फारशी संधी मिळाली नसली तरी त्यांनी आजपर्यंत अनेक देशांच्या खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे आणि या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत पदके मिळविली आहेत.
भारतामधील मुष्टीयुद्धाच्या प्रगतीबाबत ड्रेक म्हणाले, विजेंदरसिंग व मेरी कोम यांनी ऑलिंपिक पदकाला गवसणी घातली आहे. त्यांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता अनेक नवोदित खेळाडूंना आहे. नवोदित व प्रगत खेळाडूंनी आपल्या तंत्रात व शैलीत सुधारणा केली पाहिजे. विशेषत: तीनही फेºयांमध्ये आक्रमक तंत्राबाबत सातत्य ठेवले पाहिजे. अनेक वेळा लढतीमधील तिसºया फेरीत अपेक्षेइतकी आक्रमकता ठेवली नाही तर आपोआपच प्रतिस्पर्धी शिरजोर होऊ शकतो.
क्यूबात भारतीय खेळाडूंनी प्रशिक्षणाची संधी साधली पाहिजे. कारण आमच्या देशात अनेक परदेशी खेळाडू विविध अकादमींमध्ये प्रशिक्षण व सरावासाठी येत असतात. काही परदेशी खेळाडू तीन चार महिने तेथे थांबून विविध स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेतात. त्यामुळे त्यांना अन्य परदेशी खेळाडूंच्या शैलीचा बारकाईने अभ्यास करता येतो असेही ड्रेक यांनी सांगितले.
खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत ड्रेक म्हणाले, अन्य परदेशी खेळाडूंच्या तुलनेत भारतीय खेळाडू कमी असतात असे मी म्हणणार नाही. कारण भारतीय खेळाडूंमध्येही तंदुरुस्ती टिकविण्याची इच्छाशक्ती आहे. फक्त त्यांनी शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक तंदुरुस्ती शंभर टक्के कशी राखता येईल यावर भर दिला पाहिजे. आपले संभाव्य प्रतिस्पर्धी कोण आहेत याबाबत व्हिडिओ चित्रणाद्वारे गृहपाठ केला पाहिजे.