चार वेळचा फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियन सॅबेस्टियन वेटेल गुरुवारी (२८ जुलै) निवृत्ती जाहीर केली. ऍस्टन मार्टिन संघासाठी खेळणाऱ्या ड्रायव्हर वेटेलने या हंगामाच्या शेवटी फॉर्म्युला वनमधून निवृत्त होणार असल्याचे सांगितले. ग्रेटर नोएडा बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे २०११ ते २०१३ दरम्यान इंडियन ग्रांप्री आयोजित करण्यात आली होती, तेव्हा तिन्ही प्रसंगी वेटेल चॅम्पियन होता. वेटेलने त्यावेळी रेड बुल संघाचे प्रतिनिधित्व केलेले.
वेटेलने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले की, हा निर्णय कठीण होता. यासाठी मी बराच विचार केला. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याला माझे प्राधान्य असेल. वेटेल हा खेळाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी ड्रायव्हरपैकी एक मानला जातो. वेटेलपेक्षा फक्त लुईस हॅमिल्टन, मायकेल शूमाकर आणि जुआन मॅन्युएल फॅन्गिओ यांनीच जास्त जागतिक विजेतेपदे जिंकली आहेत. तसेच हॅमिल्टन आणि शूमाकर यांनीच वेटेलपेक्षा जास्त शर्यती जिंकल्या आहेत. २०१० ते २०१३ या चार वर्षात तो सर्वात यशस्वी ड्रायव्हर होता.
नुकताच ३५ वर्षांचा झालेला वेटेल वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच गो कार्टींगद्वारे ड्रायव्हिंग क्षेत्रात आला होता. २००६ पासून त्याने व्यावसायिक फॉर्मुला वन ड्रायव्हिंगला सुरुवात केली. त्याने आपल्या कारकीर्दीत बीएमडब्ल्यू सोबर, टोरो रोसो, रेड बुल, फेरारी व ऍस्टन मार्टिन या संघासाठी आपले कौशल्य पणाला लावले.
ऍस्टन मार्टिन संघाला पुढील हंगामासाठी वेटेलला कायम ठेवायचे होते. परंतु वेटेलने निर्णय घेतला की तो खेळापासून दूर जात आहे. अलिकडच्या वर्षांत वेटेल सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांविरोधात प्रचारक बनला आहे. वेटेलने नेहमीच सोशल मीडियापासून आपले अंतर राखले होते. परंतु निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी बुधवारी त्याने आपले इन्स्टाग्राम खाते सुरू केलेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार ‘गब्बर’ ठरतोय माहीपेक्षाही वरचढं?, केलीये ‘या मोठ्या विक्रमाची बरोबरी