भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या काहीश्या खराब फॉर्ममधून जात आहे. नोव्हेंबर २०१९ तो एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावू शकला नाही. क्रिकेटविश्वातील ‘फॅब फॉर’ पैकी एक असणाऱ्या विराटचा हा शतकांचा दुष्काळ संपण्याची सर्व चाहते वाट पाहत आहेत. फॅब फोरमध्ये समाविष्ट असणारे इतर तीन फलंदाज म्हणजे ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन व इंग्लंडचा कर्णधार जो रूट यांनी आपले अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक केव्हा ठोकले होते, याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
विराट कोहली –
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत ९४ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २७ शतके आणि २५ अर्धशतके लगावली आहेत. कोहलीने शेवटचे शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध केले होते. मात्र, यानंतर कोहली कसोटीमध्ये खेळलेल्या १८ डावांमध्ये एकही शतक लगावू शकला नाही. एवढेच नाही, तर कोहलीने शेवटचे वनडे शतकदेखील वेस्टइंडिज विरुद्ध २०१९ मध्येच ऑगस्ट महिन्यात लगावले होते. त्यानंतर, एकूण १५ सामने खेळूनही त्याला शतक करता आले नाही.
स्टीव्ह स्मिथ-
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत ७७ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २७ शतके आणि ३१ अर्धशतके ठोकली आहेत. स्मिथने आपले शेवटचे कसोटी शतक याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात भारताविरुद्ध केले होते. यानंतर त्याने २ अर्धशतकेही केली आहेत. तसेच भारताविरुद्ध नोव्हेंबर २०२० मध्ये स्मिथने अखेरचे वनडे शतक केले होते.
केन विलियम्सन –
आपल्या नेतृत्वात न्यूझीलंड संघाला पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद मिळवून देणाऱ्या, विलियम्सनने ८५ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये २४ शतकांसह ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. विलियम्सनने शेवटचे कसोटी शतक याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात पाकिस्तानविरुद्ध ठोकलेले. तेव्हा त्याने २३८ धावांची दमदार खेळी केली होती. तसेच, वनडे सामन्यात विलियम्सनने त्याचे शेवटचे शतक २०१९ च्या जून महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध विश्वचषकात झळकावले होते. त्यानंतर, तो केवळ ७ वनडे सामने खेळला आहे.
जो रूट –
इंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार जो रूटने आतापर्यंत १०८ कसोटी सामने खेळले असून, ज्यामध्ये त्याच्या नावे २३ शतक आणि ५० अर्धशतके आहेत. रूटने त्याचे शेवटचे शतक सध्या चालू असलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात केले होते. ज्यामध्ये त्याने १२१ धावांची खेळी केली. तसेच याच मालिकेत लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यात रूटने नाबाद १८० धावांचीदेखील खेळी केली होती. रूटने वनडे सामन्यांतील आपले शेवटचे शतक २०१९ वनडे विश्व चषकात वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलेले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मैदानावर आक्रमक असल्याने गांगुलीला मदत मिळायची, विराटचेही असेच काही आहे’, दिग्गजाचे मत
रोहित सुपरहिट! अर्धशतकासह ‘या’ विक्रमाला घातली गवसणी; केली पंतची बरोबरी
पुण्यात नीरज चोप्राच्या नावाने स्टेडियमचे उद्घाटन, ‘गोल्डन बॉय’ने ‘या’ शब्दात मानले आभार