रविवारी (22जुलै) पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज फखर जमानने तीन विश्वविक्रम रचले आहेत.
त्याने या सामन्यात 83 चेंडूत 85 धावा करताना 10 चौकार आणि 1 षटकार मारला आहे. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील सहावे अर्धशतक आहे. याबरोबरच तो वनडेत सर्वात जलद 1000 धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने हा टप्पा त्याच्या 18 व्या डावात पूर्ण केला.
तसेच त्याने झिम्बाब्वे विरुद्धच्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत एक शतक, एक द्विशतक आणि दोन अर्धशतकांच्या सहाय्याने एकूण 515 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो वनडे क्रिकेट इतिहासात 5 सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत 500 पेक्षा जास्त धावा करणारा पहिलाच फलंदाज बनला आहे.
तसेच जमान या सामन्यात तब्बल 455 धावा केल्यानंतर बाद झाला आहे. वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा बाद होण्याच्या कालावधीत केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्याच मोहम्मद युसुफच्या नावावर होता. त्यानी 2002 मध्ये वनडेत दुसऱ्यांदा बाद होण्याच्या कालावधीत 405 धावा केल्या होत्या.
रविवारी या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 364 धावा केल्या आहेत. त्यामुळे झिम्बाब्वेला या वनडे मालिकेत व्हाइटवॉश टाळण्यासाठी 365 धावांचे आव्हान आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–अॅडम गिलक्रिस्टचा विश्वविक्रम मोडत क्विंटन डी कॉकने रचला इतिहास
–केदार जाधवला टीम इंडियात निवड झाल्याबद्दल कोहलीने दिली होती ही खास भेट
–सर व्हिव रिचर्ड्स यांना मागे टाकत या पाकिस्तानी फलंदाजाने रचला विश्वविक्रम