जोहान्सबर्ग। रविवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना द वंडरर्स स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानला जरी पराभवाचा सामना करावा लागला असला तरी फखर जमानने सर्वांचे मन जिंकले आहे. त्याने द्विशतक थोडक्यात हुकले आहे. तरी त्याच्या नावावर एक मोठा विश्वविक्रम झाला आहे.
थोडक्यात हुकले द्विशतक
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करतान ३४१ धावांचा डोंगर उभा करत पाकिस्तानला ३४२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करत असताना सलामीला उतरलेल्या फखर जमानने १५५ चेंडूत १९३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १८ चौकार आणि १० षटकार मारले. त्याने वनडे कारकिर्दीतील दुसरे द्विशतक केवळ ७ धावांनी हुकले.
तो सामन्याच्या शेवटच्या षटकात पहिल्या चेंडूवर धावबाद झाला. झाले असे की लुंगी एन्गिडीने टाकलेल्या चेंडूवर फखरने फटका मारला. त्यानंतर तो आणि त्याच्याबरोबर फलंदाजीला असलेल्या हॅरीस रॉफने धावा मिळवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी पहिली धाव यशस्वी पार केली. मात्र दुसरी धाव घेत असताना दक्षिण आफ्रिकेचा क्षेत्ररक्षक एडेन मार्करमने यष्टीरक्षक उभ्या असलेल्या एन्डकडे चेंडू फेकला आणि तो चेंडू थेट स्टंपला लागला. त्यावेळी फखर क्रिजमध्ये परतलेला नव्हता, त्यामुळे त्याला बाद होऊन परतावे लागले.
यावेळी दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटॉन डीकॉकची चालाखी कामी आली. कारण त्याने अशी कृती केली की फलंदाजाला असे वाटेल की क्षेत्ररक्षक गोलंदाजाच्या एन्डला चेंडू फेकणार आहे. ज्यामुळे फखरने मागे वळून पाहिले आणि त्याला क्रिजमध्ये येण्यास काही सेंकद उशीर झाला आणि तो धावबाद झाला. तसेच द्विशतकाची संधीही हुकली.
यापूर्वी फखरने २०१८ साली झिम्बाब्वेविरुद्ध बुलवायो येथे झालेल्या वनडे सामन्यात नाबाद २१० धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो त्यावेळी पाकिस्तानकडून वनडेत द्विशतक करणारा पहिला फलंदाज ठरला होता.
https://twitter.com/ItsRobin_here/status/1378748763217403907
https://twitter.com/Sabaz_Hilali_/status/1378748670028447746
That's why said Don't trust anyone in This fake world , De Kock cunning worked ????????
So SaD FakhaR????????#PakvRSA #fakharzaman pic.twitter.com/5lLNizV35F— Imran Khan (@mujtabamalik119) April 4, 2021
फखरने केला विश्वविक्रम
फखर जरी १९३ धावांवर बाद झाला असला तरी त्याच्या नावावर एक विश्वविक्रम झाला आहे. तो वनडेमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने शेन वॉट्सनला मागे टाकले आहे. वॉट्सनने बांगलादेशविरुद्ध २०११ साली धावांचा पाठलाग करताना नाबाद १८५ धावांची खेळी केली होती.
त्यापाठोपाठ एमएस धोनी आणि विराट कोहली आहे. धोनीने श्रीलंकेविरुद्ध २००५ साली जयपूर येथे नाबाद १८३ धावांची तर विराटने पाकिस्तानविरुद्ध मिरपूर येथे २०१२ साली १८३ धावांची खेळी धावांचा पाठलाग करताना केली होती.
दक्षिण आफ्रिकेचा विजय
दक्षिण आफ्रिकेकडून या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार तेंबा बाऊमाने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली. तसेच यष्टीरक्षक फलंदाज क्विंटॉन डी कॉकने ८० धावांची खेळी केली. याशिवाय रस्सी वॅन डर दसन (६०) आणि डेव्हिड मिलर(५०) यांनीही अर्धशतके केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ३४१ धावांचा डोंगर उभा केला होता.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानला ५० षटकांत ९ बाद ३२४ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून फखर व्यतिरिक्त केवळ बाबर आझमला २० धावांचा टप्पा ओलांडता आला. आझमने ३१ धावांची खेळी केली. अन्य सर्व फलंदाज २० धावांच्या आतच बाद झाले.
या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे ७ एप्रिलला होणारा तिसरा आणि अखेरचा वनडे सामना मालिकेतील निर्णायक सामना असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीच्या आव्हानासाठी मुंबईचे शिलेदार सज्ज, ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह उतरतील गतविजेते
जिंकलस भावा! विराट कोहलीच्या सामाजिक कार्यात आणखी एक भर, पशू-पक्ष्यांच्या मदतीसाठी आला धावून
चेन्नई संघासाठी यंदा ‘हे’ खेळाडू ठरू शकतात ट्रम्पकार्ड, संघाच्या प्रशिक्षकानेच केला खुलासा





