आयपीएल २०२१ त्याच्या सर्वात रोमांचक टप्प्यात पोहोचला आहे. या स्पर्धेत आता प्लेऑफचे सामने सुरु होतील. पण आता या स्पर्धेबरोबरच जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या महिन्यात सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषकाकडे देखील आहेत. त्यातही भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी या टी२० विश्वचषकातील आपल्या अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्ध खेळून करणार आहेत. या दोन संघात २४ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
या सामन्याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये असलेली उत्सुकता यावरून लक्षात येते की, या सामन्याची तिकिटे ३३३ पट महाग विकली गेली आहेत. चाहत्यांनी सर्वात महाग तिकीट खरेदी करण्यासाठी २ लाख रुपयांपर्यंत खर्च केला आहे. यानंतरही काही चाहत्यांना तिकीट मिळू शकलेले नाही.
अशात, एका चाहत्याने रोहित शर्माकडे शुक्रवारी (८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची मागणी केली. चाहत्याने यासाठी एक पोस्टरही तयार केले होते, ज्यावर असे लिहिले होते की ‘रोहित भारत आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दोन तिकिटांची गरज आहे. कृपया मिळवून दे.’ हे पोस्टर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
A fan requesting Rohit Sharma for 2 tickets for India Vs Pakistan World Cup game. pic.twitter.com/KyTl8mLz2j
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 8, 2021
भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे २ लाखांपर्यंत विकली गेली. भारत-पाकिस्तान सामन्याच्या सुरुवातीच्या तिकिटाची किंमत १२,५०० रुपये होती. याशिवाय प्रीमियम आणि प्लॅटिनम स्टॅण्डची तिकिटे ३१,२०० आणि ५४,१०० रुपयांना विकली गेली. मात्र, या तीन श्रेणींची सर्व तिकिटे आता विकली गेली आहेत.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्स शुक्रवारी त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने या सामन्यात २३५ धावा केल्या, ही त्यांची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबईला हैदराबादला १७१ पेक्षा जास्त धावांनी पराभूत करावे लागणार होते. पण सनरायझर्सने ८ गडी गमावून १९३ धावा केल्या. त्यामुळे जिंकल्यानंतरही मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली.
आता, कोलकाता नाईट रायडर्सने चौथा संघ म्हणून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्लेऑफमध्ये आपले स्थान आधीच पक्के केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
शोएब मलिकचा टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात समावेश, ‘या’ खेळाडूऐवजी मिळाले स्थान
टी२० विश्वचषकात यंदा पहिल्यांदाच घडणार ‘या’ ५ गोष्टी
टी२० विश्वचषकासाठी उम्रान मलिक भारतीय ताफ्यात सामील होणार, आयपीएलमध्ये विराटलाही केलेले प्रभावित