सामन्यातील अखेरच्या षटकांमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळख मिळवलेल्या महेंद्रसिंग धोनीला गोलंदाजी करणे हे जगातील सर्वच गोलंदाजांसाठी आव्हान होते. या गोष्टीची कबुली खुद्द अनेक गोलंदाजांनीच दिलेली आहे. मैदानावर स्थिरावल्यानंतर शेवटच्या षटकात आक्रमक फलंदाजी करण्यावर धोनीचा विश्वास असतो. धोनीने विशेषतः ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामगिरी केलेली आहे. दरम्यान नुकतेच ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना धोनीबद्दलही एका बाबीचा उलगडा केला आहे.
कमिन्सला एका क्रिकेट चाहत्याने विचारले की, जर विरुद्ध संघाला एका चेंडूत 6 धावा हव्या असतील आणि तुझ्यासमोर महेंद्रसिंग धोनी फलंदाजी करत असेल तर तू कुठे गोलंदाजी करशील? कमिन्सला चाहत्याने यूट्यूबवर हा प्रश्न विचारला होता.
कमिन्स या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला की, ‘मी अशा परिस्थितीत गोलंदाजी करणार नाही व जर ही परिस्थिती उद्भवली तर मी त्याला बाउन्सर किंवा वाईड यॉर्कर टाकेल.’
कमिन्स पुढे म्हणाला की, ‘मला वाटते की यॉर्कर चेंडू चुकला तर त्यावर धोनीने मारलेले षटकार मी अनेक वेळा पाहिले आहे. म्हणून मी त्याला यॉर्कर्स न टाकता बाउन्सर किंवा स्लो बॉल टाकेल. विशेष म्हणजे पॅट कमिन्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीला दोन वेळा बाद केले आहे. पॅट कमिन्सने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हा पराक्रम केला आहे.’
धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2019 च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीमध्ये खेळला होता. यानंतर,15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता तो केवळ आयपीएलमध्ये खेळत आहे. आयपीएल 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा संघ व स्वतः कर्णधार धोनी देखील खूपच खराब फॉर्ममध्ये होता.
आयपीएल 2020 मध्ये संघ प्रथमच प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही. मात्र आयपीएल 2021 मध्ये संघाने शानदार पुनरागमन केले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान चेन्नईचा संघ शानदार क्रिकेट खेळत होता.मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 स्पर्धा 29 सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली होती. दरम्यान, नुकतीच बातमी समोर येत आहे की, सप्टेंबर महिन्यामध्ये आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रेक्षकांना तेव्हा धोनीला मैदानात खेळताना बघता येईल.
महत्त्वाच्या बातम्या –
पुन्हा पाहायला मिळणार ‘गेल स्टॉर्म’! ‘या’ संघाशी झाला करारबद्ध
बुडत्याला काठीचा आधार! सुशील कुमारची ‘ही’ मागणी कोर्टाने केली मान्य