भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) (BCCI) बहुप्रतिक्षित निवडणूक बिनविरोध पार पडली. बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून भारताचे माजी अष्टपैलू व 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेल्या रॉजर बिन्नी (Roger Binny) यांची निवड झाली. ते बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष म्हणून सौरव गांगुली यांची जागा घेतील. बीसीसीआय अध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली असली तरी, क्रिकेटपटू म्हणून देखील त्यांची कारकीर्द शानदार राहिली आहे. (Roger Binny Becomes New BCCI President)
रॉजर बिन्नी हे भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळणारे पहिले अँग्लो इंडियन होते. ते मूळतः स्कॉटिश वंशाचे आहेत. मध्यमगती गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजी असे अष्टपैलू असलेल्या बिन्नी यांनी 1979 मध्ये भारतासाठी पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला वनडे सामना खेळला.
रॉजर बिन्नी यांना भारताने जिंकलेल्या 1983 क्रिकेट विश्वचषकासाठी नेहमी लक्षात ठेवले जाते. त्यांनी त्या संपूर्ण विश्वचषकात सर्वाधिक 18 बळी मिळवलेले. त्यानंतर दोन वर्षांनी ऑस्ट्रेलिया झालेल्या वर्ल्ड सिरीज क्रिकेट चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करत 17 बळी मिळवत भारतीय संघाला विजेतेपद जिंकून देण्यात मोठे योगदान दिलेले.
बिन्नी यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीकडे पाहिल्यास दिसून येते की, आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 27 कसोटी सामने खेळताना 47 बळी व 830 धावा केल्या. वनडे क्रिकेटचा विचार केल्यास त्यांच्या नावे 72 सामन्यात 77 बळी व 629 धावा जमा आहेत. कर्नाटकसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळताना त्यांनी अनेक विक्रम रचले. 136 सामन्यात त्यांनी 34.08 च्या सरासरीने 6579 धावा केल्या. यात 14 शतकांचा समावेश होता. तसेच, 205 बळी त्यांनी मिळवलेले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे पहिले संचालकपद भूषवले. त्यानंतर ते भारतीय संघाच्या निवड समितीचे सदस्य देखील होते. तसेच, सध्या ते कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकाच्या ‘या’ विक्रमावर विराट, रोहितची नजर! जयवर्धनेची 8 वर्षांची बादशाहत उध्वस्त करण्याची संधी
पहिला आणि एकमेव; रोहित वा विराट नव्हे तर ‘या’ एकट्या भारतीय धुरंधराने टी२० विश्वचषकात ठोकलंय शतक