भारताचे माजी वेगवान गोलंदाज रमाकांत देसाई यांनी आपल्या भन्नाट स्पेल द्वारे प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या मनात धडकी भरवायचे. एकेकाळी त्यांच्या गोलंदाजीपुढे फलंदाजांना जगणं मुश्किल झाले होते. रमाकांत देसाई यांच्या गोलंदाजीपुढे फलंदाजांकडे कोणतेच उत्तर नव्हते. रमाकांत देसाई यांची आज 81 वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यावर टाकलेला हा प्रकाश.
5 फूट 4 इंच उंची असलेल्या रमाकांत देसाई यांनी मुंबईकडून पदार्पण करताना पहिल्याच रणजी मोसमात धमाका करत 50 बळी टिपले. या धमाकेदार प्रदर्शनानंतर त्याची 1959 ला भारतीय संघात निवड झाली. दिल्ली येथील कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध खेळताना त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्यात त्याने 169 धावा देत महत्त्वपूर्ण 4 गडी बाद केले. पण या सामन्यात भारताचा डावाने पराभव झाला.
एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून छाप टाकलेल्या रमाकांत देसाई यांनी ब्रेबॉन स्टेडियमवर डिसेंबर 1960 ला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 10 व्या क्रमांकावर खेळत 85 धावांची खेळी साकारली होती.
आपल्या धारदार गोलंदाजीने रमाकांत देसाई यांनी पाकिस्तानचे माजी दिग्गज फलंदाज मोहम्मद हानीफ यांना चांगलेच सतावले. देसाई यांनी हनीफ यांना 9 डावात 4 वेळा बाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
रमाकांत देसाई निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष झाले. शरीर साथ देत नसल्याने ते जास्त काळ निवड समितीच्या अध्यक्षपदावर राहू शकले नाहीत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. निवड समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी सचिन तेंडुलकरला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. तसेच खराब फॉर्मामुळे सचिन तेंडुलकरकडून नेतृत्वपदही काढून घेण्याचे धाडसही दाखवले.
रमाकांत देसाई यांनी भारताकडून खेळताना 28 कसोटी सामन्यात 74 बळी टिपले. मुंबईकडून खेळताना 150 प्रथम श्रेणीच्या सामन्यात 24.10 च्या सरासरीने 468 बळी घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बळी घेण्याचा विक्रम करणारे रमाकांत देसाई यांनी भारताकडून जास्त सामने खेळले नाहीत. भारतातल्या निर्जीव खेळपट्यांमुळे वयाच्या 29 व्या वर्षी त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. रमाकांत देसाई यांना जास्त आयुष्य लाभले नाही. 1998 साली वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.