राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल २०२१ चा ४७ वा सामना खेळला गेला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. ऋतुराजने दमदार शतक झळकावले आणि निर्धारित २० षटकात १८९ धावा केल्या. प्रतिउत्तरादाखल राजस्थानने दमदार सुरुवात केली आणि सलामीवीर यशस्वी जयस्वालने वेगवान अर्धशतक झळकावले. त्याने १९ चेंडूत शतक झळकावत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
या खेळी दरम्यान यशस्वी जयस्वालने आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या अनकॅप्ड खेळाडूंच्या (आंतरराष्ट्रीय पदार्पण न केलेले खेळाडू) यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. या यादीत पहिल्या स्थानावर ईशान किशन आहे त्याने २०१८ साली केकेआर विरुद्ध १७ चेंडूत अर्धशतक केले होते. त्यावेळी त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले नव्हते.
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर दिपक हुडा आहे त्याने अनुक्रमे २०२१ मध्ये राजस्थानविरुद्ध २० चेंडूत आणि २०१६ साली दिल्लीविरुद्ध २२ चेंडूत अर्धशतक केले होते. पाचव्या क्रमांकावर कृणाल पंड्या आहे. त्याने २०१६ साली २२ चेंडूत अर्धशतक केले होते.
तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसने (२५) ४७ धावांची भागीदारी करत चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आलेल्या मोईन अली (२१), सुरेश रैना(३) आणि अंबाती रायुडूला(२) फार विशेष कामगिरी करता आली नाही. पण सलामीवीर ऋतुराज गायकवाडने एका बाजूने खेळपट्टीवर उभा राहिला.
अखेरच्या काही षटकांमध्ये त्याला रवींद्र जाडेजाने चांगली साथ दिली. दोघांनी पाचव्या गड्यासाठी ५५ धावांची भागीदारी रचली. ऋतुराज शेवटपर्यंत नाबाद राहिला. या दरम्यान त्याने आयपीएल कारकिर्दीतलं पहिलं शतक साजरं केलं. त्याने ६० चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी केली.
प्रतिउत्तरदाखल, राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि एव्हिन लुईसने या सामन्यात आक्रमक सुरुवात केली. ५.२ षटकांमध्ये दोघांनी ७७ धावांची सलामी दिली. लुईस २७ धावांवर बाद झाल्यानंतरही यशस्वी जयस्वाल फटकेबाजी सुरुच ठेवली. त्याने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक साजरे केले. त्याने ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले.
त्यानंतर मैदानात आलेल्या संजू सॅससनने २८ धावांची उपयुक्त खेळी केली. जयस्वाल बाद झाल्यानंतर शिवम दुबेने जोरदार फटकेबाजी केली. दुबेने ४२ चेंडूत ६४ धावांची नाबाद खेळी केली. दुबेने ४ चौकार आणि ४ षटकार ठोकले. या खेळींच्या जोरावर राजस्थाने ७ गडी आणि १५ चेंडू राखून चेन्नईने दिलेलं आव्हान पार केलं.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईच्या २४ वर्षीय ऋतुराजने लगावले विक्रमी शतक; रैना, विजयला पछाडले
गंभीरने नाव न घेता धोनीला म्हटले तथाकथित फिनिशर? भडकलेल्या चाहत्यांनी व्यक्त केला संताप