आयपीएलच्या १३व्या हंगामाला शनिवार मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरुवात झाली. चेन्नईने या सामन्यात ५ विकेट्सने मुंबईवर शानदार विजय मिळवला. या सामन्यानंतर रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज ११ पंजाब संघात आयपीएलचा दुसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे झाला.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १५२ धावा केल्या. एकवेळ ३ बाद १३ अशी अवस्था असलेल्या संघाला पुढे कर्णधार श्रेयस अय्यर व यष्टीरक्षक रिषभ पंतच्या फलंदाजीने सावरले. त्यानंतर पुन्हा ६ बाद ९६ अशा मोठ्या संकटात संघ सापडला.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टोयनीस मात्र जोरदार धमाका केला. त्याने केवळ २१ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्याला केएल राहुल व निकोलस पुरनने धावबाद केले. परंतू धावबाद होण्यापुर्वी त्याने एक खास विक्रम केला.
दिल्ली कॅपिटल्स संघाकडून चौथे वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम आता मार्कस स्टोयनीसच्या नावावर झाला आहे. २० चेंडूत त्याने हा कारनामा केला आहे. दिल्लीकडून सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा कारनामा ख्रिस मॉरीसने केला आहे. त्याने २०१६मध्ये गुजरात लायन्स संघाविरुद्ध १७ चेंडूत अर्धशतक केले होते.
रिषभ पंतने दिल्लीकडून २०१९मध्ये मुंबईविरुद्ध १८ तर विरेंद्र सेहवागने २०१२मध्ये राजस्थानविरुद्ध २० चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती. आता सेहवागबरोबर मार्कस स्टोयनीसच्या नावावरही २० चेंडूत दिल्लीकडून तिसरे वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम जमा झाला आहे.