लीड्स। काल(21 जून) 2019 विश्वचषकात श्रीलंकेने यजमान इंग्लंडला पराभवाचा जोरदार धक्का देत आपले स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडला 20 धावांनी पराभूत केले आहे. श्रीलंकेच्या या विजयात अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाने मोलाचा वाटा उचलला.
मलिंगाने या सामन्यात 10 षटकात 43 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. याबरोबरच त्याने वनडे विश्वचषकात 50 विकेट्स घेण्याचा टप्पाही पार केला आहे. वनडे विश्वचषकात हा टप्पा पार करणारा तो एकूण चौथा खेळाडू ठरला आहे.
त्याने आत्तापर्यंत विश्वचषकात 26 सामन्यातील 25 डावात गोलंदाजी करताना 51 विकेट्स घेतल्या आहेत.
याबरोबरच तो वनडे विश्वचषकात सर्वात जलद 50 विकेट्स घेणाराही गोलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम ग्लेन मॅकग्राथ आणि मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर विभागून होता. त्यांनी विश्वचषकात 30 डावात 50 विकेट्सचा टप्पा पार केला होता.
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 232 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने 85 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर इंग्लंडकडून गोलंदाजीत जोफ्रा आर्चर आणि मार्क वूडने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच आदिल राशिदने 2 आणि ख्रिस वोक्सने 1 विकेट घेतली.
त्यानंतर 233 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 47 षटकात सर्वबाद 212 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून जो रुट(57) आणि बेन स्टोक्सने(82*) अर्धशतकी खेळी करत चांगली लढत दिली होती. परंतू अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.
श्रीलंकेकडून मलिंगाने सर्वाधिक 4 विकेट्स तर धनंजय डि सिल्वाने 3विकेट्स, इसरु उडानाने 2 विकेट्स आणि नुवान प्रदीपने 1 विकेट घेतली.
#वनडे विश्वचषकात सर्वात जलद 50 विकेट्स घेणारे गोलंदाज –
25 डाव – लसिथ मलिंगा
30 डाव – ग्लेन मॅकग्राथ, मुथय्या मुरलीधरन
33 डाव – वासिम अक्रम
#वनडे विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
71 विकेट्स – ग्लेन मॅकग्राथ
68 विकेट्स – मुथय्या मुरलीधरन
55 विकेट्स – वासिम आक्रम
51 विकेट्स – लसिथ मलिंगा
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
–टॉप ५: भारत-अफगाणिस्तान सामन्यात हे खास ५ विक्रम करण्याची भारतीय खेळाडूंना संधी
–किंग कोहलीला सचिन-लाराचा विश्वविक्रम मागे टाकत इतिहास घडवण्याची आज सुवर्णसंधी