हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) च्या यंदाच्या पर्वाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे आणि जमशेदपूर एफसी पुन्हा मुसंडी मारण्यासाठी प्रयत्नशील आहे. गुरुवारी (22 डिसेंबर) त्यांच्यासमोर फॉर्मामध्ये असलेल्या एफसी गोवा संघाचे आव्हान असणार आहे. जेआरडी टाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ही लढत होणार असल्याने जमशेदपूर एफसी घरच्या मैदानावरून नव्याने सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. मागच्या पर्वातील लीग शिल्ड विजेत्या जमशेदपूर एफसीला सलग सात सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे आणि ते चार गुणांसह तालिकेत ११व्या क्रमांकावर आहेत.
आयएसएलमध्ये आता त्यांचे 10 सामने शिल्लक आहेत आणि त्यात विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण, त्यांच्यासमोर सध्या तगड्या फॉर्मात असलेल्या एफसी गोवाचे आव्हान आहे आणि त्यांनी 18 गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे. याच पर्वातील आधीच्या सामन्यात एफसी गोवाने 3-0 अशा फरकाने जमशेदपूर एफसीला पराभूत केले होते.
मागील आठवड्यात जमशेदपूर एफसीला 0-1 अशा फरकाने बंगळुरू एफसीकडून हार मानावी लागली होती. जमशेदपूरने मागील तीनही सामन्यांत 0-1 अशाच फरकाने हार मानली आहे. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना गोल करण्यापासून रोखले आहे, परंतु आक्रमणात त्यांची बाजू कमकुवत दिसत आहे आणि मुख्य प्रशिक्षक एडी बूथ्रॉयड यांना आक्रमणपटूंकडून अपेक्षा आहे.
रफाएल क्रिव्हेलारो हा पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी मेहनत घेतोय, असे बूथ्रॉयड यांनी सांगितले. संघात नव्याने दाखल झालेला हा खेळाडू दोन सामने खेळला, परंतु तासाभराच्या आतच त्याने मैदान सोडले. एफसी गोवाविरुद्धच्या लढतीत हा ब्राझिलीयन खेळाडू सुरुवातीपासून मैदानावर उतरण्याची शक्यता आहे.
“आतापर्यंतचा हंगाम भयानक होता. प्रत्येकासाठी मागील काही महिने कठीण गेले आहेत. या गोष्टी कशा बदलायच्या आणि जिंकण्याच्या मार्गाकडे परत कसे यायचे, या दृष्टीने काम सुरू आहे. आम्ही जानेवारीमध्ये सक्रिय होऊ, पुनरागमन करू. जानेवारीत तुम्हाला पूर्णपणे वेगळा संघ पाहायला मिळेल. असा संघ जो आक्रमण करू शकतो आणि प्रगल्भ असेल. आम्ही अजूनही त्या अव्वल-सहा स्थानाचे ध्येय सोडलेले नाही. हे एक कठीण आहे, परंतु आम्हाला जे हवे आहे, ते आम्ही मिळवू,” असे बूथरॉइड म्हणाले.
दुसरीकडे एफसी गोवा संघाने हळुहळू वेग पकडला आहे आणि पर्वाच्या दुसऱ्या टप्प्यातही ते सकारात्मक सुरुवात करण्यास सज्ज आहेत. मागील 10 सामन्यांपैकी त्यांनी 6 मध्ये विजय मिळवले आहेत. यंदाच्या पर्वात प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानावर 5 पैकी 2 सामने त्यांना जिंकता आले आहेत. मागील सामन्यात कार्लोस पेनाच्या या संघाने नॉर्थ ईस्ट युनायटेड विरुद्ध तीन गुणांची कमाई केली. इकर गौरात्स्केना व एडू बेडिया यांनी गोल केले होते. नोआ सदौईचा फॉर्म कायम आहे आणि त्यानेही गोल सहाय्य केले. बचावात फॅरेस अर्नोट आणि अन्वर अली यांची कामगिरी दमदार झालेली आहे.
Matchday in the City of Steel 😍🤍#ForcaGoa #UzzoOnceAgain #JFCFCG #HeroISL pic.twitter.com/Sxdo1tZuaP
— FC Goa (@FCGoaOfficial) December 22, 2022
”पहिल्या टप्प्यातील सामन्यापेक्षा उद्याचा सामना हा नक्की वेगळा असेल. तेव्हा आम्ही चांगली कामगिरी केली होती, परंतु त्यानंतर परिस्थिती बदलली. त्यांनी काही नवीन परदेशी खेळाडू आपल्या ताफ्यात दाखल केले आहेत. जमशेदपूर एफसीचा आदर करतच आम्ही येथे दाखल झालो आहोत, परंतु आम्हाला तीन गुण हवे आहेत,”असे पेना म्हणाले.
आयएसएलमध्ये दोन्ही संघांमध्ये 11 सामने झाले आहेत. त्यातील एफसी गोवाने 6, तर जमशेदपूरने 4 विजय मिळवले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या कसोटीत बांगलादेशने जिंकला टॉस, भारताच्या संघात एक बदल; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
Video: तब्बल 24 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत सचिन एकदाच झाला यष्टीचीत, जाणून घ्या कोण होता तो गोलंदाज