गोवा (१४ जानेवारी) एफसी गोवा संघाच्या आक्रमणाला नॉर्थ ईस्ट युनायटेडच्या बचावफळीनं तोडीसतोड उत्तर दिलं. विशेषतः नॉर्थ ईस्टचा गोलरक्षक मिर्शाद मिचू यानं एफसी गोवा संघाच्या जॉर्ज ऑर्टीजचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे इंडियन सुपर लीगमधील ( आयएसएल) आजची लढत ही १-१ अशी बरोबरीत सुटली. हर्नान सांतानानं दुसऱ्या मिनिटाला नॉर्थ ईस्ट युनायटेडला आघाडी मिळवून दिली, पण त्याला ३९व्या मिनिटाला एफसी गोवा संघाच्या एरान कॅब्रेरानं प्रत्युत्तर दिलं.
एफसी गोवाचा मागील काही सामन्यांतील खेळ उंचावलेला दिसला आणि तेच नॉर्थ ईस्ट युनायटेला मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, दुसऱ्याच मिनिटाला लिएंडर डी’कुन्हाला चुकीच्या पद्धतीनं टॅकल करणं महागात पडलं अन् एफसी गोवा संघाच्या खेळाडूला पिवळं कार्ड दाखवण्यात आलं. त्याचवेळी नॉर्थ ईस्टला फ्री किक मिळाली आणि हर्नान सांताना यानं संधीचं सोनं केलं. त्यानं डायरेक्ट किक घेताना चेंडू गोलजाळीत पाठवला आणि नॉर्थ ईस्ट युनायडेटचे खाते उघडले. पण, एफसी गोवानं चांगले प्रत्युत्तर दिले, परंतु त्यांना अंतिम स्वरूप देता येत नव्हते. त्यांनी दोन-तीन वेळा चेंडू पेनल्टी बॉक्समध्ये नेऊन गोल करण्याच्या संधी निर्माण करताना नॉर्थ ईस्टच्या बचावफळीला तणावात ठेवले. १६व्या मिनिटाला डेशॉन ब्राऊनला गोल करण्याची संधी मिळाली होती. वन ऑन वन गोलमध्ये ब्राऊननं तटवलेला चेंडू गोलपोस्टवरून गेला अन् नॉर्थ ईस्टला आणखी एक गोल करता आला नाही. २३ व्या मिनिटाला ब्राऊन व सुहैर यांनी पुन्हा चेंडू पेलन्टी क्षेत्रात नेला, परंतु या दोघांमधील ताळमेळ चुकलं.
एफसी गोवाच्या जॉर्ज ऑर्टीज, एरान कॅब्रेरा, एल्बेर्टो नोग्युएरा आणि अलेक्झांडर जेसुराज हे सातत्यानं नॉर्थ ईस्टची बचावफळी भेदून गोल करण्याच्या संधी निर्माण करत होते. ३० व्या मिनिटाला ऑर्टीजनं सेट पिस तयार करून दिला होता, परंतु जेसुराजनं टोलावलेला चेंडू नॉर्थ ईस्टच्या गोलरक्षक मिर्शाद मिचूनं अडवला. एफसी गोवानं चेंडूवर सर्वाधिककाळ ताबा राखताना जोरदार आक्रमण केले होते. ३९व्या मिनिटाला अखेर त्यांना बरोबरीचा गोल करण्यात यश आलं. नोग्युएरानं कॉर्नरवरून पाठवलेला चेंडू कॅब्रेरानं हेडरद्वारे गोलमध्ये पाठवला. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांकडून तुल्यबळ खेळ झाला. गोवाकडून सातत्यानं आक्रमण झालेलं पाहायला मिळालं, तरीही त्यांना पहिल्या हाफमध्ये १-१ अशा बरोबरीवर समाधानी रहावं लागलं.
४८व्या मिनिटाला एफसी गोवाकडून पहिला प्रयत्न झाला. जेसुराजनं लाँग रेंजवरून गोलजाळीच्या दिशेनं चेंडू भिरकावला, पण नॉर्थ ईस्टच्या गोलरक्षकानं तो अडवला. नॉर्थ ईस्टला ५६व्या मिनिटाला मोठा धक्का बसला. त्यांच्या ताफ्यातील होतकरू खेळाडू रोछार्झेल याला खांद्याला दुखापत झाल्यामुळे मैदान सोडावे लागले. ६६व्या मिनिटाला ऑर्टीजच्या प्रयत्न मिर्शादनं अचूकरितीनं अडवून गोवा संघाला आघाडी घेऊ दिली नाही. ६८व्या मिनिटाला पुन्हा एकदा ऑर्टीजनचा पेनल्टी बॉक्समधून गोल करण्याचा प्रयत्न मिर्शादनं हाणून पाडला. ७३व्या मिनिटाला ऑर्टीज चेंडू घेऊन ६ यार्ड नजीक पोहोचला होता, परंतु यावेळेस गुरजिंदर सिंगनं सुरेख ब्लॉक केला. ऑर्टीजचे सातत्यानं प्रयत्न करणे नॉर्थ ईस्ट युनायटेडसाठी डोकेदुखी ठरत होते. तो एकटा नॉर्थ ईस्टच्या बचावपटूंना व्यग्र ठेवत होता. ७५ मिनिटांच्या खेळात एफसी गोवाला १४ क्रॉस मिळाले, त्यांनी ५ प्रयत्न शॉर्ट ऑन टार्गेट मारले, तर ८ प्रयत्न ऑफ टार्गेट राहिले.
आता अखेरच्या १५ मिनिटांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. ७९व्या मिनिटाला सामन्यात नाट्यमय घडामोड घडली. ऑर्टीजनं फ्री किकवर मारलेला चेंडू मिर्शादनं अडवला, परंतु तो चेंडू हातात ठेऊ शकला नाही आणि त्यावेळेस गोलपोस्ट नजीक असलेल्या कॅब्रेरानं चेंडू पुन्हा गोलजाळीच्या दिशेनं टोलवला. मिर्शादनं चेंडू अडवण्यासाठी डाईव्ह मारली, पण चेंडू गोलजाळीत गेला. मात्र, मैदानावरील पंचांनी तो फाऊल दिला अन् गोवाला आघाडी मिळू शकली नाही. ८३व्या मिनिटाला असाच प्रसंग नॉर्थ ईस्ट सोबत घडला अन् तोही फाऊल दिला गेला. ८७व्या मिनिटाला पुन्हा ऑर्टीज विरुद्ध मिर्शाद यांच्या नॉर्थ ईस्टच्या गोलीनं बाजी मारली. निर्धारीत ९० मिनिटांतही ही बरोबरीची कोंडी कायम राहिली.
निकाल – नॉर्थ ईस्ट युनायटेड १ ( हर्नान सांताना २ मि. ) बरोबरी विरूद्ध एफसी गोवा १ ( एरान कॅब्रेरा ३९ मि. )