भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. आता संघाच्या पुढील आव्हान दक्षिण आफ्रिका असेल. दक्षिण आफ्रिका संघ तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. उभय संघातील टी20 मालिका 28 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. टी20 विश्वचषकापूर्वी संघाला स्वतःची गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टीने ही शेवटची संधी असेल. या मालिकेसाठी भारतीय संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, काही वृत्तसंस्थांनी याबाबतची बातमी दिली आहे.
एका प्रमुख वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघात काही बदल करण्यात आले आहेत. हार्दिक पंड्या याला विश्रांती दिली असून, त्याच्या जागी शाहबाझ अहमद याची संघात निवड केली गेलीये. पाठदुखीमुळे दीपक हुडा हा देखील विश्रांती घेईल. त्याची जागा श्रेयस अय्यर याला देण्यात आली आहे. कोरोनातून अद्याप बरा न झालेल्या मोहम्मद शमीच्या जागी उमेश यादव हाच संघासोबत राहील. युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक मुख्य संघाचा भाग नसेल. हार्दिक पंड्यासह भुवनेश्वर कुमार हा देखील संघाचा भाग असणार नाही. हार्दिक व भुवनेश्वर यादरम्यान राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिपोर्टिंग करतील. तर इराणी चषकात हनुमा विहारी शेष भारत संघाचे नेतृत्व करेल.’
तसेच मिळत असलेल्या माहितीनुसार ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल व संजू सॅमसन हे दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघासाठी खेळताना दिसतील. मागील वर्षभरापासून जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मध्य प्रदेशच्या रजत पाटीदार याला देखील प्रथमच भारतीय संघात निवडले जाऊ शकते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका एकमेकांविरुद्ध आधी तीन सामन्यांची टी20 तर त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. यानंतर दोन्ही संघ विश्वचषकात सहभागी होतील.