या वर्षी होऊ घातलेल्या फिफा अंडर १७ विश्वचषकाचे आयोजन भारताकडे आहे. त्यामुळे भारताकडे व भारतीय फुटबॉल संघाकडे जगाचे लक्ष लागणार हे खरे. काल भारताचा पहिला सामना पार पडला. निकाल आपल्याला अपेक्षित असा नसला तरी अनेक खळाडूंची कामगिरी चांगली झाली.
पण ज्या देशांमध्ये फुटबॉलला खूप लोकप्रियता आहे अशा देशांकडे सुद्धा क्रीडा रसिक विशेष लक्ष ठेवणार आहेत. जसे की, स्पेन, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी इ. जिथे फुटबॉल मोठ्या प्रमाणावर खेळला जातो.
आपसूकच अशा देशांच्या खेळाडूंवरती विशेष लक्ष केंद्रित करायला भाग पडते, असे काही खेळाडू पुढीलप्रमाणे:
१) जेन फीएटे अर्प
पोझिशन: फॉरवर्ड
वय:-१७
देश:- जर्मनी
क्लब:- हॅम्बर्ग
या खेळाडूने बुंडेस्लिगा टूर्नामेंट मध्ये इतिहास रचला होता. फीएटे अर्प जर्मन फुटबॉल लीगच्या टॉप टियर मध्ये खेळला आहे. त्याचबरोबर यूरो अंडर १७ चॅम्पियनशिपमध्ये केलेल्या अफलातून खेळीच्या जोरावर हॅम्बर्ग क्लबने त्याचे कॉन्ट्रॅक्ट २०१९ पर्यंत वाढविले.
क्रोशिया मध्ये झालेल्या टूर्नामेंट मध्ये फीएटे अर्पने चार सामन्यात दोन वेळा हॅटट्रिक लगावली होती.
२) इमाइन गौईरी
पोझिशन:- फॉरवर्ड
वय:- १७
देश:- फ्रान्स
क्लब:- ओलंपिके लियोने
मँचेस्टर युनायटेड, जुवेंटस, आणि चल्सी यांसारख्या क्लबची नजर खूप दिवसांपासून एका युवा फुटबॉलरवरती आहे आणि तो म्हणजे इमाइन गौईरी. अशा क्लबची नजर त्याच्यावर आहे म्हणजे त्याच्यात काहीतरी वैशिष्ट्य आहे हे नक्की.
फ्रान्सचा हा खेळाडू कमी वयात चमकणारा एक तारा आहे. गौईरीने क्रोशिया मध्ये झालेल्या यूरो अंडर १७ चॅम्पियनशिप मध्ये ८ गोल स्कोअर करत टूर्नामेंट मध्ये झालेल्या आजवरच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. गौईरीने भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी हंगेरी विरूद्ध एकुलता एक गोल करीत टूर्नामेंटमध्ये फ्रान्सची जागा पक्की केली होती.
३) एबेल रूइज
पोझिशन :- फॉरवर्ड
वय:- १७
देश:- स्पेन
क्लब:- बार्सिलोना
एबेल रूइज नामवंत अशा ‘ला मासिया’ म्हणजेच बार्सिलोना अकॅडमीचा खेळाडू आहे. विशेष म्हणजे तो सध्या टीममध्येही खेळत आहे. रूइज २०१५ पासून अंडर १७ साठी खेळत आहे. आत्ता पर्यंत त्याने आपल्या टीम साठी १९ गोल केले आहेत.
नुकत्याच झालेल्या ग्रनाडा विरुद्धच्या सामन्यात त्याने बार्सिलोना बी कडून खेळताना पहिला गोल केला होता. त्यामुळे स्पेन वासियांच्या या खेळाडूकडून खूप अपेक्षा आहेत. रूइजने काही दिवसांपूर्वीच यूएफा युरो अंडर १७ चँपियनशिपमध्ये स्पेन साठी ४ गोल केले होते.
४) जेडन सांचो
पोझिशन :- फॉरवर्ड
वय :-१७
देश :- इंग्लंड
क्लब:- बोरशिया डार्टमंड
इंग्लंडचा हा खेळाडू त्या वेळी चर्चेत आला जेव्हा जर्मनीच्या बोरशिया डार्टमंड क्लबने त्याला मँचेस्टर सिटीकडून १ कोटी पाऊंड देऊन खरेदी केले होते. यामध्ये आश्चर्यकारक बाब ही की, लगेचच त्याला जर्सी क्र-७ दिली होती जी की बार्सिलोनाचे ९.२ कोटीचा खेळाडू उस्मान डेंबल घालत होता.
यावरूनच समजते की क्लबचा नव्या पिढीवर किती भरोसा आहे. याआधी सांचोला युरो अंडर १७ चँपियनशिपमध्ये गोल्डन प्लेयर अॉफ दी टूर्नामेंट म्हणून निवडले गेले होते. या खेळाडूने स्वत: ५ गोल करत आणि ५ गोल मध्ये असिस्ट करत इंग्लंडला फायनल पर्यंत पोहचवलं होतं.
५) जॉश सार्जंट
पोझिशन : फॉरवर्ड
वय:-१७
देश:- अमेरिका
क्लब :- सेंट लुईस स्कॉट गैलेगर
अमेरिकेचा हा हॉट शॉट खेळाडू या टूर्नामेंटचा स्मार्ट खेळाडू आहे. सार्जंट या वर्षी आपला दुसरा विश्वचषक खेळत आहे. या आधी या खेळाडूने कोरियामध्ये फिफा अंडर २० मध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे ह्या खेळाडूला अनुभव चांगला आहे.
या विश्वचषकात या खेळाडूंकडे फुटबॉलप्रेमींचे चांगलेच लक्ष असणार आहे यात काही शंका नाही.
किरण शिंदे
(टीम महा स्पोर्ट्स)