अंडर १७फुटबॉल विश्वचषकाचा थरार राऊंड ऑफ १६ मधून आता उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. उपांत्यपूर्व फेरीत खेळणारे सर्व संघ निश्चित झाले आहे. सर्वांना अमेरीका विरुद्ध इंग्लंड या सामन्याची ओढ लागली आहे. त्याचबरोबर आज असा सामना होणार आहे जो या विश्वचषकातील विजेता ठरवणारा सामना होऊ शकतो.
आज घाना विरुद्ध माली हे उपांत्यपूर्व फेरीसाठीच्या सामन्यासाठी मैदानात उतरतील. घाना हे या स्पर्धेचे २ वेळा विजेते असले तरी त्यांचे शेवटचे विजेतेपद हे ११९५ सालचे आहे. ते मागील काही वर्षांपासून आपल्या त्या कामगिरीच्या खाणाखुणा शोधून विजेतेपद पटकावण्यासाठी खूप प्रयन्तशील आहे. राऊंड ऑफ १६ मधील सामन्यात त्यांनी या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या निगर संघाला २-० अशी धूळ चारली होती.
निगर विरुद्धच्या सामन्यात घानाने खेळाच्या सर्व आघाड्यांवर खूप चांगला खेळ करत सामन्यात पूर्णवेळ अधिराज्य गाजवले होते. त्यामुळे हा सामना एकतर्फी झाला होता. परंतु घाना माली विरुद्ध सामना खेळण्यास उतरेल तेव्हा परिस्थिती नक्कीच बदललेली असणार आहे.
माली संघाने घानाला अंडर १७ आफ्रिका कप ऑफ नेशन्सच्या अंतिम सामन्यात १-० असे पराभूत करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्या पराभवाची परतफेड करण्याच्या उद्देशाने घाना या सामन्यात उतरेल.
या सामन्यात डिफेन्सिव्ह खेळावर भर देत मोक्याच्या वेळी प्रतिआक्रमणे करून सामना जिंकायचा अशी रणनीती आखून घाना सामन्यात उतरेल असे वाटते आहे. कारण मागील काही सामन्यात त्यांनी अश्याच प्रकारची रणनीती आखली होती आणि त्यात त्याना यशहीआलेले होते.
माली संघानी स्पर्धेची सुरुवात जरी पॅराग्वे विरुद्धच्या पराभवाने केली असली तरी त्या सामन्यात देखील त्याने अधिकाधिक वर्चस्व स्थापन करून २ गोल लगावले होते. त्यामुळे या संघाला तुम्ही गोल करण्यापासून रोखू शकत नाही. या संघातील नंबर १०,१९ आणि ३ या खेळाडूंवर विशेष लक्ष असे. नंबर १० म्हणून खेळणारा मालीचा सलाम त्यांचा मुख्य मिडफिल्डर असून त्याच्या खेळावर मालीच्या खेळात चढ-उतार पाहायला मिळतात.
हा सामना प्रेक्षकांसाठी खूप मोठी पर्वणी ठरणार असून हा सामना मालीचा नेत्रदीपक अटॅक विरुद्ध घानाचा बचाव असा रंगण्याची जास्त शक्यता आहे.