मेक्सिकोने फिफा विश्वचषक २०२६ च्या राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. आपल्या संघाचा विजय साजरा करण्यासाठी हजारो चाहते रस्त्यावर जमले. अचानक गर्दी झाल्याने अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आणि चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडले.
राऊंड ऑफ ३२ मध्ये मेक्सिकोने इक्वाडोरचा २-० असा पराभव केला. हा विजय मिळवल्यानंतर देशाची राजधानी असलेल्या शहरात अनेक चाहते सेलिब्रेशन करण्यासाठी एकत्र आले. त्यामध्ये तिघांचा गुदमरून मृत्यू झाला, अशी माहिती समोर येत आहे.
पासेओ दे ला रेफोर्माच्या आसपास वेगवेगळ्या ठिकाणी तीन लोकांवर आपत्कालीन पथकाने उपचार केले. शहराचा तो मुख्य रस्ता असल्याने चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता यावा यासाठी तेथे मोठ-मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.
मेक्सिको जिंकल्यानंतर चाहत्यांनी स्वातंत्र्य स्मारकाच्या परिसरात फटाक्यांची आतषबाजी केली. झोकालोपासून चापल्टेपेक पार्कपर्यंत पसरलेल्या जवळपास ५ किलोमीटर लांबीच्या पासेओ दे ला रेफोर्मा रस्त्यावर हजारो चाहते उभे होते. तेथेच ही घटना घडली. (Many people died in Mexico City after the national team defeated Ecuador to reach Round Of 16)
मोठ्या स्पर्धेदरम्यान अनेकदा चाहत्यांचा अतिउत्साह दिसून येतो. आपल्या संघाच्या विजयानंतर लोक शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी गर्दी करत जल्लोष साजरा करतात. अशावेळी चाहत्यांनी त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. अति गर्दी, उष्णता आणि रस्त्यावर अधिक काळ राहिल्याने अस्वस्थता येऊ शकते. या घटनेने आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून दिली की, सेलिब्रेशनवेळी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.
सामन्याची स्थिती पाहिली तर मेक्सिकोने दोन्ही गोल पहिल्या हाफमध्ये केले. पहिला गोल २२ व्या मिनिटाला ज्युलियन क्विनोनेसने केला आणि दुसरा गोल १० मिनिटांपेक्षा कमी वेळेत इक्वेडोरच्या चुकीचा फायदा घेत राऊल हिमेनेझने केला.
चाळीस वर्षांत बाद फेरीतील या पहिल्या विजयामुळे मेक्सिकोचा पुढील सामना इंग्लंडशी (६ जुलै) होणार आहे.






