---Advertisement---

FIFA WORLD CUP: जपानचे स्वप्न भंगले! पेनल्टी शूट आऊटमध्ये क्रोएशियाचा 3-1 ने विजय

On: सोमवार, डिसेंबर 5, 2022 11:41 PM
---Advertisement---

कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकात सोमवारी (5 डिसेंबर) पहिला उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना क्रोएशिया विरुद्ध जपान यांच्या दरम्यान खेळला गेला. आशियातील ताकदवर संघ म्हणून स्पर्धेत सहभागी झालेल्या जपानने या सामन्यात गतविश्वचषकातील उपविजेत्यांना पेनल्टी शूटआउटमध्ये नेले. अखेरीस क्रोएशियाचा गोलरक्षक लिवाकोविक याने तीन पेनल्टींचा बचाव करत संघाला उपांत्यपूर्व फेरीत नेले.

साखळी फेरीत स्पेन आणि जर्मनीसारख्या माजी विजेत्या संघांना पराभूत करणाऱ्या जपानकडून चांगली कामगिरी अपेक्षा होती. त्यांनीही चाहत्यांना अजिबात निराश केले नाही. अल जानोब स्टेडियमवर झालेल्या सामन्यात जपानने बलाढ्य क्रोएशिया संघाला कडवी झुंज दिली. 43 व्या मिनिटाला डेजानने गोल करत जपान संघाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, त्यांची आघाडी फार काळ टिकली नाही. कारण दुसऱ्या हाफमध्ये 10 मिनिटांत अनुभवी इव्हान पेरिसिकने गोल करून सामना बरोबरीत आणला.

मात्र, यानंतर दोन्ही संघांचे प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर या वर्षीच्या बाद फेरीत प्रथमच सामना अतिरिक्त वेळेत गेला. ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही सामन्याचा निकाल बदलला नाही. अशा परिस्थितीत सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. पेनल्टी शूट आउटमध्ये 27 वर्षीय क्रोएशियन गोलरक्षक डॉमिनिक लिवाकोविकने जपानचे 3 पेनल्टी शॉट्स रोखून संघाला विजय मिळवून दिला.

लिवाकोविकने पहिल्या दोन पेनल्टी अडवत आपल्या संघाला सामन्यात पुढे नेले. तर, क्रोएशियाने आपल्या पहिल्या दोन पेनल्टी सत्कारणी लावल्या. त्यानंतर जपानने आपले खाते खोलले. तर, क्रोएशियाचा एक शॉट गोलपोस्टला धडकला.‌ त्यानंतर जपानने आणखी एक संधी दवडली. तर, क्रोएशियाने त्यानंतर गोल मारत विजय संपादन केला.

(FIFA World Cup Croatia Beat Japan In Penalty Shootout )

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---