कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत शनिवारी (26 नोव्हेंबर) गतविजेता फ्रान्स संघ मैदानात उतरला. युरोपातील दुसरा संघ डेन्मार्कविरुद्ध त्यांचा सामना रंगला. या सामन्यात फ्रान्सने अपेक्षेप्रमाणे खेळ दाखवत 2-1 असा विजय नोंदवला. यासह स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा हा पहिला संघ बनला आहे. फ्रान्सने आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 4-1 असे पराभूत केले होते.
𝙌𝙐𝘼𝙇𝙄𝙁𝙄𝙀𝘿 🔥
Heading for the last 1️⃣6️⃣ of the World Cup 🇫🇷 #FiersdetreBleus #FRADEN pic.twitter.com/hbLOLQyTaR— French Team ⭐⭐ (@FrenchTeam) November 26, 2022
स्टेडियम 974 येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात फ्रान्सला डेन्मार्ककडून कडवी झुंज मिळाली. पूर्वार्धात दोन्ही संघांना कोणतेही यश मिळाले नाही. त्यामुळे पहिल्या सत्राच्या अखेरीस दोन्ही संघ गोल शून्य बरोबरीत होते. एम्बाप्पे, ग्रिझमन व जिरॉड यांसारख्या उत्कृष्ट स्ट्राईकर्सने भरलेल्या या संघाला डेन्मार्कच्या बचावफळीने घाम गाळायला लावला.
दुसऱ्या हाफमध्ये 61 व्या मिनिटाला हर्नांडेस याच्यासह उत्कृष्ट चाल रचत एम्बाप्पेने फ्रान्सला आघाडीवर नेले. त्यांची ही आघाडी जमतेम सात मिनिटे टिकली. क्रिस्टीनसनने हेडरद्वारे गोल करत डेन्मार्क संघाला सामन्यात बरोबरी साधून दिली. सामना अनिर्णित होण्याकडे झुकलेला असताना 86 व्या मिनिटाला पुन्हा एकदा एम्बाप्पेने जाळीचा वेध घेत फ्रान्स संघाला पुढे केले. उर्वरित तसेच अतिरिक्त वेळेत डेन्मार्क संघाने गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश लाभले नाही. यासोबतच फ्रान्स संघ ड गटातून उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल होणारा पहिला संघ बनला. तसेच एम्बाप्पेने केवळ नवव्या विश्वचषक सामन्यात सातवा गोल झळकावत मेस्सीला मागे टाकले.
(fifa world cup France Entered in pre quarter finals)