क्रिकेटला संपूर्ण क्रीडाविश्वात सभ्य माणसांचा खेळ म्हणजेच ‘जंटलमन्स गेम’ म्हणून ओळखले जाते. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक जुन्या-जाणत्या क्रिकेटपटूंपासून सध्याच्या अनेक युवा क्रिकेटपटूंच्या खिलाडूवृत्तीचे दाखले दिले जातात. भारताचा माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज राहुल द्रविड याची क्रिकेटविश्वातील आजवरचा सर्वात सभ्य क्रिकेटपटू म्हणून ओळख आहे. मात्र, याच भारतीय संघात असे काही क्रिकेटपटू आहेत, ज्यांची भर मैदानात आपल्या संघातील खेळाडूंसोबत हमरातुमरी झाली. आज आपण भारतीय क्रिकेट इतिहासातील अशाच तीन दुर्दैवी घटनांविषयी जाणून घेणार आहोत.
१) सुरेश रैना व रवींद्र जडेजा (२०१३)
भारतीय संघ २०१३ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला होता. तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार एमएस धोनी दुखापतग्रस्त झाल्याने संघाबाहेर झालेला व नेतृत्व युवा विराट कोहलीकडे सोपवलेले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीज धावांचा पाठलाग करत होता. त्यादरम्यान अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या चेंडूवर अनुभवी सुरेश रैनाने एक झेल सोडला. त्यावेळी जडेजाचा तोंडून काहीतरी शब्द बाहेर पडले व त्यामुळे मैदानावरील वातावरण तणावाचे बनले. रैना तात्काळ जडेजाकडे धावत आला व त्यांचा शाब्दिक वाद रंगला. अखेरीस, दोघांनी सामन्यानंतर या वादावर पडदा टाकला. त्यावेळी या घटनेची खूप चर्चा झाली होती.
२) हरभजन सिंग व अंबाती रायुडू (२०१७)
भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंग व अंबाती रायुडू हे आयपीएलमध्ये अनेक वर्ष मुंबई इंडियन्सचा भाग होते. मात्र, २०१६ दरम्यान या दोन्ही खेळाडूंत भर मैदानात शाब्दिक चकमक रंगलेली. रायझिंग पुणे सुपरजायंट विरुद्धच्या सामन्यात हरभजनच्या गोलंदाजीवर रायुडूकडून खराब क्षेत्ररक्षण झाले. त्यावर हरभजन संतापला व त्याने काही अपशब्द बोलले. आपल्या तापट स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला रायुडू लगोलग त्याच्याकडे येऊ लागला. रायुडूचा हा रुद्रावतार पाहून हरभजनने तात्काळ माफी मागितली आणि प्रकरण संपवले. पुढे काही वर्षानंतर दोघांनी मैदानावरील असे किरकोळ वाद आमच्या वैयक्तिक नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकत नाहीत, असे म्हटले.
३) रवींद्र जडेजा व ईशांत शर्मा (२०१८)
भारतीय संघाने २०१८-२०१९ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी करून दाखवली होती. मात्र, त्यावेळी अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा व अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यात भर मैदानात काहीसे वाकयुद्ध झाले होते. पर्थ येथील कसोटीत दोन्ही खेळाडूंमध्ये क्षेत्ररक्षणावरून वाद रंगल्याचे सांगण्यात आले. या वादाची त्यावेळी फारशी चर्चा झाली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या –
चाहत्यांच्या उत्साहाला येणार उधाण! या सामन्यात दिसणार १८ हजार प्रेक्षक
स्मृती मंधाना बनली आत्मनिर्भर, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
कोरोना झाल्यावर या गोष्टीची सर्वाधिक भीती वाटत होती, अक्षर पटेलने उलगडला अनुभव